कामठी :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी दि. १९/११/२४ रोजी दुपारी १२.०० वा कामठी तालुक्याला भेट देऊन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेतला. मतदानाला केवळ काही तास शिल्लक असल्याने तालुक्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलीस यंत्रणा सुसज्ज ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी विविध मतदान केंद्रांची पाहणी केली. कामठी येथील संवेदनशील आणि मिश्र वस्ती भागांमध्ये आरसीपी पथक व पोलीस अधिकारी, अंमलदारांसह पायदळ पेट्रोलिंग करून परिस्थितीचे प्रत्यक्ष निरीक्षण केले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कामठी येथे स्थापन करण्यात आलेल्या ईव्हीएम वितरण केंद्राला भेट देऊन पोलीस आयुक्तांनी ईव्हीएम वितरण आणि बंदोबस्ताबाबत कामठी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. विशाल शिरसागर यांच्याकडून आढावा घेतला. कामठी मतदारसंघात १३० मतदान केंद्रे व ३४६ पोलिंग बूथ असून क्रिटिकल बूथ व स्पेशल बूथ आहेत. मतदान प्रक्रियेसाठी मुबलक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस आयुक्तांनी कामठी तालुक्यातील जुने कामठी व नवीन कामठी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या संवेदनशील भागांना भेट दिली. जुने कामठी पोलीस ठाणे अंतर्गत संघमैदान,राम मंदिर परिसर मच्छी पूल, मदन चौक, बोरकर चौक, चावडी चौक आणि हैदरी चौक या भागांना भेट देऊन सरस्वती शिशू मंदिर येथील बूथची पाहणी केली. नवीन कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत हाजी सेठ जूसब गनी गर्ल्स उर्दू प्रायमरी स्कूल आणि इस्माईलपुरा, मोदीपडाव या भागांमध्ये आरसीपी पथकासह पायदळ पेट्रोलिंग करून सुरक्षेचा आढावा घेतला. पोलीस आयुक्तांनी मतदानाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पोलीस यंत्रणा सुसज्ज असल्याबाबत खात्री केली .
मतदार केंद्रांवर सुरक्षा, वाहतुकीची व्यवस्था व शांततेचे वातावरण राखण्यासाठी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे असे परिमंडळ क्र. ५ चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी पोलीस आयुक्तांना भेटी दरम्यान आश्वस्त केले. यावेळी कामठी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल शिरसागर, विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे, जुने कामठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार जुमडे व कामठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोरे यांच्यासह इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.