– वायू गुणवत्ता व्यवस्थापना संदर्भात बैठक
नागपूर :- नागपूर शहरातील वायू गुणवत्ता निर्देशांक मध्यम मध्यम श्रेणीत येत असल्यामुळे शहरातील वायू प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी मनपासह केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नीरी, वाहतूक पोलिस या सर्व विभागांनी सामूहिक प्रयत्न करावे अशा सूचना मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी दिल्या.
नागपूर शहरातील वायू गुणवत्ता व्यवस्थापना संदर्भात बुधवारी(ता.13) मनपा मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली. बैठकीत उपायुक्त सर्वश्री विजय देशमुख, डॉ. गजेंद्र महल्ले, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, ‘नीरी’च्या चीफ सायंटिस्ट डॉ. पद्मा राव, प्रिसिंपल सायंटिस्ट डॉ. संगीता गोयल सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) माधुरी बावीस्कर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओटकरी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राजेंद्र पाटील, सार्वजनिक आरोग्य अभियंता संदीप लोखंडे, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सल्लागार डॉ. संदीप नारनवरे यांच्यासह मनपाचे अधिकारी स्तरीय समितीचे अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय हरित लवाद यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील शहराकरिता श्रेणीबद्ध प्रतिसादकृती आराखडयाच्या अंमलबजावणीबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे. यात नागपूर शहरातील वायू गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत येत असल्याने याबाबत शासनाकडून निर्देशित केलेल्या उपाय योजना राबविण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी वायू प्रदुषण नियंत्रणाच्या बाबतीत विविध मुद्दांवर चर्चा केली.
नागपूर शहराच्या काही भागांमध्ये वायू गुणवत्ता संनियंत्रण स्थानक उभारण्यात आलेले आहेत. या स्थानकांवर शहरातील हवेची गुणवत्ता दर्शविली जाते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दिशा निर्देशानुसार काही ठिकाणचे स्थानक हे स्थानांतरीत करण्याची गरज असल्याचे मत यावेळी ‘नीरी’च्या वैज्ञानिकांनी व्यक्त केले. तसेच नागपूर शहरातील वायू गुणवत्ता संचालन सयंत्र स्थानांतरीत करण्याबबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
शहरात सुरू असलेल्या बांधकामाच्या धुळीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता कमी होत असून, अनेक ठिकाणी बांधकाम सुरू असल्यामुळे धुळीचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. बांधकाम स्थळी पाण्याची फवारणी केल्यास धुळ कमी करता येऊ शकेल, ग्रीन नेटचा वापर करता येऊ शकेल, बांधकामाची परवाणगी देतांनाच निघणार्या सी ॲन्ड डी वेस्टची योग्य विल्हेवाट लावण्याची सोय करण्यात यावी, परिसरात कचरा जाळू नये याची दक्षता घ्यावी, अशी देखील सूचना वायू प्रदूषणाच्या नियंत्रणाकरिता बैठकीत मांडण्यात आल्या.