यवतमाळ :- शेतात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून राबणारे बैल हे शक्तीचे आणि श्रमाचे प्रतिक आहे. त्यांच्याप्रती केवळ पोळा या सणालाच नव्हे तर आपण कायमच कतज्ञ आहोत, असे प्रतिपादन राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
येथील समता मैदानात आज सोमवारी दुपारी आयोजित पोळा उत्सवात ते बोलत होते. सध्या जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू असून, शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. तरीही आपल्या लाडक्या जित्राबासाठी सर्व दु:ख बाजूला सारून शेतकरी बांधव पोळा हा सण साजरा करत आहे. अशा परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई संदर्भात शासनाकडे अहवाल पाठविण्याचे निर्देश आजच जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितले. शासन शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते मानाच्या बैलजोडीचे पूजन करून शेतकऱ्यास गौरविण्यात आले. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोडी सजवून पोळ्यात आणल्या होत्या. उत्कृष्ठ ठरलेल्या बैलजोडीचे मालक मोहन देवकर, सरदर चौधरी, दीपक सुलभेवार, रवींद्र पेंदोर, सोनू चौधरी आदींना यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी रंजक झडत्या सादर करून पोळा उत्सवात रंगत भरली. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.