नागपूर :- कृत्रिम अवयव, ई-रिक्षा, उपचारासाठी वैद्यकीय मदत यासह विविध मागण्यांची निवेदने स्वीकारत केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी दिव्यांगांना आधार दिला. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने मदत करण्याच्या सूचना ना. गडकरी यांनी दिल्या. खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात त्यांनी विविध मागण्यांची निवेदनेही स्वीकारली.
यापूर्वीचे दोन जनसंपर्क कार्यक्रम नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासमध्ये आयोजित करण्यात आले. त्यावेळी महानगरपालिकेशी व नासुप्रशी संबंधित समस्यांचीच निवेदने ना. गडकरी यांनी स्वीकारली होती. यंदा कार्यालयात नियमित जनसंपर्क असल्यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तरुणांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.
दिव्यांगांनी सरकारी योजनांमधून मदत मिळण्याबाबत, कृत्रिम अवयव मिळण्याबाबत, ई-रिक्षा तसेच ट्रायसिकल मिळण्याबाबतची निवेदने ना. गडकरींना दिली. काहींनी वैद्यकीय मदत मिळण्यासंदर्भातही निवेदन दिले. मंत्री महोदयांनी प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच तातडीने मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
काहींच्या हाती मागण्यांची निवेदने होती तर काही लोक केवळ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आले होते. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसह महिलांच्या संदर्भातील मागण्यांची निवेदने ना. गडकरी यांनी स्वीकारली. त्याचवेळी ‘आपण पुढाकार घेतल्यामुळे काम झाले’ अशी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या नागरिकांच्या शुभेच्छाही त्यांनी स्वीकारल्या. वैयक्तिक कामांसह प्रशासकीय कामांपर्यंत सर्व प्रकारच्या विषयांसाठी यावेळी नागरिकांनी मंत्री महोदयांची भेट घेतली.
भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी
जनसंपर्क कार्यक्रमात दुपारी १.३० ते २.३० या वेळेत ना. गडकरी यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी भाजपचे नागपूर शहराध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, माजी नगरसेवक अॅड. निशांत गांधी आदींची उपस्थित होती. ना. गडकरी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विविध मागण्यांची निवेदने स्वीकारली.