मोफत विजेचा फायदा शेतकऱ्यांनाच, होगाडेंकडून शेतकऱ्यांचा अपमान – महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची टीका

मुंबई :- शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याचा महायुती सरकारचा निर्णय ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांनाच लाभ होणार असून समाजवादी पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांची केवळ महावितरणचाच फायदा होणार असल्याची तक्रार दिशाभूल करणारी आहे. होगाडे यांच्याकडून शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजनेला रेवडी म्हणणे हा शेतकऱ्यांचा अपमान आहे, अशी टीका महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी केली.

विश्वास पाठक म्हणाले की, प्रताप होगाडे हे स्वतःला वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ञ म्हणवत असले तरी शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजनेच्या बाबतीत मात्र ते केवळ समाजवादी पार्टीच्या कार्याध्यक्षपदाच्या भूमिकेतूनच टीका करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कृषीपंपांचे वीजबिल सरकार भरणार आहे. त्यासाठी सरकारने १४,७६० कोटी रुपये तरतूद केली आहे. सरकारने ही योजना पाच वर्षे चालेल असे शासननिर्णयात स्पष्ट केले असूनही होगाडे यांनी त्याला निवडणूक जुमला म्हणणे चुकीचे आहे. त्यांनी या योजनेचे वर्णन रेवडी असे केले असून हा तर लाभार्थी शेतकऱ्यांचा अपमान आहे.

त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासन व महावितरणच्या पुढाकाराने राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही योजना राबविण्यात येत आहे. याच्या अंतर्गत नऊ हजार मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यात येत आहेत. यातून निर्माण होणाऱ्या विजेचा उपयोग शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी होणार आहे तसेच यामध्ये सुमारे ३ रुपये प्रतियुनिट दराने वीज मिळणार आहे. काही महिन्यातच टप्प्या टप्प्याने या प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू होत असून त्यामुळे शेतकऱ्यांसाठीच्या वीज खरेदीचा खर्च व परिणामी सबसिडीची गरज खूप कमी होणार आहे. महायुती सरकारने बळीराजा मोफत वीज योजना सुरू करताना पूर्ण नियोजन केलेले आहे. त्यामुळे ही योजना टिकाऊ आणि शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे.

प्रताप होगाडे स्वतःला वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष म्हणवतात आणि ज्या योजनेमुळे शेतकऱ्यांसोबतच महावितरणला लाभ होत असेल त्याला बदनाम करतात, हे आश्चर्यकारक आहे. महावितरणचा ताळेबंद आणखी सुधारल्यामुळे भविष्यात राज्यातील वीज ग्राहकांच्या वीजबिलात सवलत मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यालाही ते राजकीय वळण देऊन विरोध करतात, हे धक्कादायक आहे. होगाडे यांनी वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष म्हणवून घेताना प्रत्यक्षात उद्योजकांसाठी विजेची प्रकरणे हाताळणे किंवा राजकीय भूमिकेतून शेतकऱ्यांच्या योजनांना विरोध करणे बंद करावे, असे पाठक म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्री रानी सती भाद्रपद महोत्सव 2 से

Sat Aug 24 , 2024
नागपुर :- प्रतिवर्ष की भांति इस वर्ष भी श्री रानी सती चैरिटेबल ट्रस्ट की ओर से श्री रानी सती भाद्रपद महोत्सव 2 व 3 सितंबर को श्री सतीधाम, श्री रानी सती मंदिर, न्यू नंदनवन ले आउट में धूमधाम से मनाया जाएगा। ट्रस्ट की अध्यक्ष रमा खेमुक़ा ने बताया कि 2 सितंबर को चुनड़ी उत्सव दोपहर 3 बजे मनाया जाएगा। वहीं […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com