पावसामुळे बाधित भागात मनपाचे मदतकार्य 

– चिखल साफ, फवारणी देखील केली 

नागपूर :- शनिवारी २० जुलै रोजी आलेल्या पावसामुळे नागपूर शहरातील अनेक भागात पाणी जमा झाले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त द्वय आंचल गोयल आणि अजय चारठणकर यांनी जलमय झालेल्या भागांमध्ये भेट देऊन पाहणी केली. बाधित भागांमध्ये मदतकार्य करण्याचे निर्देश आयुक्तांनी प्रशासनाला दिले. त्यांच्या निर्देशानुसार शनिवारपासून (ता.२०) मनपाद्वारे विविध भागांमध्ये मदतकार्य सुरु आहे.

नागपूर महानगरपालिकेचे अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग, उद्यान विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग, आरोग्य विभाग, हिवताप व हत्तीरोग विभाग या सर्व विभागांद्वारे समन्वयाने मदत आणि सेवाकार्य करण्यात येत आहे.

शनिवारी आलेल्या पावसामुळे नागपूर शहरातील अनेक भागात पाणी जमा झाले, झाडे पडली. मनपाच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाद्वारे जलमय भागातून नागरिकांना सुखरूप बाहेर काढून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. झाडे पडलेल्या भागात अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग आणि उद्यान विभागाद्वारे पडलेली झाडे, फांद्या हटविण्याचे कार्य आज रविवारी देखील सुरु आहेत.

पाणी जमा झालेल्या भागातून पाण्याचा निचरा करण्यात आला. या भागांमध्ये चिखल जमा असून ते देखील घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे स्वच्छ करण्यात येत आहे. पावसाळी नाल्यांची देखील स्वच्छता सुरु आहे. हिवताप व हत्तीरोग विभागाद्वारे स्वच्छता झालेल्या भागांमध्ये डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येत आहे.

पावसामुळे बाधित भागातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी मनपाचे सर्व विभाग प्राधान्याने जलदगतीने काम करीत आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त द्वय आंचल गोयल व अजय चारठणकर हे देखील स्वतः वेळोवेळी कामाचा आढावा घेत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ओटीटीच्या स्पर्धेत मराठी सिनेमा टिकवणे गरजेचे – अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड

Mon Jul 22 , 2024
यवतमाळ :- कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर बघू, ही प्रेक्षकांची मानसिकता झाली आहे. मात्र आपला चित्रपट टिकवायचा असेल तर ही मानसिकता बदलावी लागेल व आपला सिनेमा आपल्यालाच मोठा करावा लागेल, असे रोखठोक मत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने मांडले. यवतमाळ येथे एका कार्यक्रमानिमित्त आली असता, येथील विश्रामगृहात प्राजक्ताने उपस्थित पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील महाराणी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com