नवी दिल्ली :- कांदा, कापूस आणि सोयाबीन दरांच्या चढउतारामुळे व्यथित झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणार असल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच पर्यावरण संतुलन टास्क फोर्स अध्यक्ष पाशा पटेल यांनी ही माहिती या भेटीनंतर दिली.
हि बैठक , केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या 8 तीन मुर्ती मार्ग येथील निवासस्थानी संपन्न झाली. बैठकीनंतर श्री. पाशा पटेल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माहिती देताना पटेल यांनी सांगितले की, वर्ष 2021 ते 2024 या काळादरम्यान महाराष्ट्रामध्ये कापूस, सोयाबीन आणि कांदा या पिकांच्या बाजारभावामध्ये चढउतार झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे सांगत , याविषयी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी या विषयावर तोडगा काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली.
पटेल यांनी या बैठकीत कापूस, सोयाबीन आणि कांदा या पिकांसंदर्भात निर्माण झालेल्या अडचणी विस्तृत आकडेवारीसह पियुष गोयल यांच्यासमोर मांडल्या. यावेळी मंत्री श्री.गोयल यांना पर्यावरण संतुलित इको फ्रेंडली बांबूपासून निर्मित श्री गणेशाची मूर्ती देखील भेट दिल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या संबंधित शेतमालाचे आयात-निर्यात धोरण आणि आयात शुल्क याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी तातडीने बैठक घेऊन या विषयांवर ठोस निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केल्याची माहिती पटेल यांनी यावेळी दिली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री यांची उच्चस्तरीय बैठक देखील आयोजित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“महाराष्ट्रातील शेती प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी एक तास बैठक झाल्याचे सांगत, या बैठकीमध्ये सर्व मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा झाली असून लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल,” असे राज्य कृषी मूल्य आयोग आणि टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी स्पष्ट केले.