– मनपा आयुक्तांचे आदेश
नागपूर :- नागपूर महानगरपालिका द्वारे पन्नासे ले-आऊट बस स्टॉप ते दातानगर गणेश किराणा स्टोअर पर्यंत व रस्ता क्र. ११ इंद्रप्रस्थ ले आऊट ते शिवानंद अपार्टमेंट पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या बांधकामाकरिता या रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
सदर मार्ग कोणत्याही वाहतुकीस पूर्णतः बंद राहणार आहे. नमूद रस्ता क्र १० व ११ वरील वाहतूक या रस्त्यालगतच्या परिसरातील अंतर्गत रस्त्याने वळविण्यात येत आहे. सदर आदेश दि. १५ जून २०२४ पासुन दि. ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत अमलात राहील. या रस्त्यांवरील कामाचे कंत्राटदार आणि कार्यकारी अभियंता यांनी खालील बाबीची सुरक्षीततेच्या दृष्टीने दक्षता घ्यावी.
कामाच्या ठिकाणी सुचना फलक व काम सुरू केल्याचा / काम पूर्ण करण्याचा दिनांक असलेला बोर्ड लावण्यात यावे. पर्यायी मार्ग सुरू होतो त्याठिकाणी दोन्ही टोकावर तसेच बॅरीकेटस जवळ रोडवर आपले वाहतुक सुरक्षा रक्षक/ स्वयंसेवक नेमावे. वाहतुक सुरक्षा रक्षक, वाहतुक चिन्हांच्या पाटया, कोनस्, बॅरीकेट, दारी रिफ्लेक्टिव्ह जॅकेटस्, एल.ई.डी. बॅटन, ब्लिंकर्स, इत्यादी संसाधने उपलब्ध करावे, काम सुरू झाल्यानंतर जमीनीतुन निघणारे मटेरियल उदा. माती, गिट्टी, पेव्हर ब्लॉक, वगैरे मुळे घसरण निर्माण होवुन वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे रस्त्यावर टाकु नये. त्याकरिता विशेष व्यवस्था करण्यात यावी. काम झाल्यानंतर सदर्ह बांधकाम दरम्यान पर्यायी मार्गावरील रस्त्यावर झालेले खड्डे तात्काळ बुजवुन त्यावर सिमेंटीकरण/ डांबरीकरण करून रोड पुर्ववत करावा.
उजव्या बाजुने दुतर्फा वाहतुक चालणार आहे त्या ठिकाणी अस्थाई रस्ता दुभाजक तयार करून एकाच मार्गावरून दुतर्फा वाहतुक वळविण्यात यावी. अनुचित प्रकार घडल्यास कंत्राटदार स्वतः जबाबदार राहतील. वाहतूक नियमांचे तसेच वाहतूक पोलिसांनी दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करावे. या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरीकांचे सोयीकरिता आवश्यक अशी व्यवहार्य उपलब्ध करुन घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.