नागपूर :- नैसर्गिक आपत्ती काळात जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी विभागीय, जिल्हा तसेच तालुकास्तरावर कार्यान्वित विदर्भातील सर्व जिल्ह्यातील यंत्रणांचा समन्वय दूरध्वनीच्या माध्यमातून सुलभ होण्याच्या दृष्टीने माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘आपत्ती व्यवस्थापन दूरध्वनी पुस्तिका-2024’ चे प्रकाशन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते आज करण्यात आले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात दूरध्वनी पुस्तिकेचे प्रकाशन झाले. महानगर पालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, विभागीय माहिती केंद्राचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी रितेश भुयार, शासकीय मुद्रणालयाचे व्यवस्थापक केतन लाड यावेळी उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन दूरध्वनी पुस्तिकेद्वारे नैसर्गिक आपत्ती काळात विविध हानी टाळण्यासाठी नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया , वर्धा व गडचिरोलीसह अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापनासाठी कार्यान्वित यंत्रणांचे दूरध्वनी देण्यात आले आहेत. या माध्यमातून विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधने सोईचे होणार असून संपर्कासाठी तत्काळ दूरध्वनी उपलब्ध होणार आहे. ही पुस्तिका ऐनपावसाळ्यापूर्वी सुबक पद्धतीने तयार केल्याबद्दल बिदरी यांनी माहिती विभागाचे कौतूक केले आहे.
या पुस्तिकेत अमरावती व नागपूर विभागातील आपत्ती नियंत्रण कक्ष व यंत्रणांचे दूरध्वनी क्रमांक, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नियंत्रण कक्ष मुंबईसह, प्रसार माध्यमे आदींचे दूरध्वनी क्रमांक समाविष्ट आहेत. तसेच नैसर्गिक आपत्ती काळात घ्यावयाच्या विविध खबरदारीबाबतही माहिती देण्यात आली आहे.