मुंबई :- जपान महाराष्ट्राला २०१७ पासून कौशल्य शिक्षण सहकार्य देत असून जपान सरकारच्या टेक्निकल इंटर्न ट्रेनिंग प्रोग्रॅम अंतर्गत राज्यातील निवडक विद्यार्थ्यांना तीन ते पाच वर्षांकरिता जपान मध्ये ऑन द जॉब कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. यातील विद्यार्थ्यांची पहिली तुकडी येत्या जून महिन्यात जपानला जाणार असल्याची माहिती जपानचे मुंबईतील नवनियुक्त कॉन्सल जनरल यागी कोजी यांनी येथे दिली.
गेल्या महिन्यात मुंबईतील वाणिज्यदूतावासाच्या कार्यभार स्वीकारल्यानंतर यागी कोजी यांनी शुक्रवारी (दि. ३१) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर देखील उपस्थित होते.
जपान – भारत व्यापार संबंधांची सुरुवात १८९३ साली झाली व जपानच्या कंपन्या मुंबईशी कापसाचा व्यापार करीत असे सांगून आज भारत – जपान संबंध अतिशय व्यापक झाले असून दोन्ही देश परस्परांचे नैसर्गिक भागीदार झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
जपान भारताला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ‘अटल सेतू’, अंडरग्राऊंड मेट्रो लाईन तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पाला आर्थिक सहयोग करीत असून राज्याच्या विकासात जपानचा वाटा असेल असे कोजी योगी यांनी सांगितले. पुणे व ओकायामा मैत्रीचे प्रतीक असलेले पुणे ओकायामा मैत्री उद्यान पुणे येथे तयार करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत व जपान सांस्कृतिक संबंधांचा मोठा इतिहास असून बुद्ध धर्मामुळे जपान व भारताचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. गेल्या दशकात भारत – जपान संबंध वेगळ्या उंचीवर गेले आहेत. जपानच्या लोकसंख्येत वरिष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे तर भारतात युवकांची संख्या जगात मोठी आहे. जपानने कौशल्य विकास व कौशल्य वर्धन या क्षेत्रात विद्यापीठ स्तरावर सहकार्य केल्यास त्याचा उभय देशांना लाभ होईल असे राज्यपालांनी सांगितले. भारताची अर्थव्यवस्था सर्वात तेजीने वाढत असून योग्य वेळी व योग्य ठिकाणी नियुक्ती झाल्याबद्दल राज्यपालांनी यागी कोजी यांचे अभिनंदन केले.