भंडारा :- जागतिक हिवताप दिन दरवर्षी 25 एप्रिल ला विविध उपक्रमाद्वारे साजरा केला जातो हिवतापाची लागण होणाऱ्या जगातील प्रमुख देशामध्ये भारताचाही नंबर लागतो. वाढती लोकसंख्या, स्वछतेचा अभाव, पूरक व पोषक वातावरण या मुळे हिवताप पसरण्यास मदत होते या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने हिवतापाविरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी,गतिमान करूया लढा हिवताप हरवण्यासाठी ” हे घोषवाक्य दिलेले आहे.
साधारण पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजारात वाढ होते. त्यात प्रामुख्याने डासा पासून प्रसारित होणारे रोग हे अधिक असतात. डासा पासून हिवताप,डेंगू ,चिकुनगुन्या, हत्तीरोग,जपानी मेंदूज्वर या सारख्या जीवघेण्या आजाराचा प्रसार होतो. हिवताप,डेंगू,जपानी मेंदूज्वर या कीटकजन्य रोगामध्ये रुग्णाचे वेळीच रोगनिदान व औषधोपचार होणे गरजेचे असते. नाही तर रुग्ण दगावण्याची शक्यता असते आणि म्हणून हिवताप विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अमंलबजावणीसाठी प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे जनतेमध्ये माहिती पोहचविणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र भंडारा येथे जागतिक हिवताप दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर यांनी हिवताप हा प्लास्मोडियम प्रकारच्या परोपजीवी जंतू मुळे होत असून हिवतापाचा प्रसार रोगी व्यक्ती कडून निरोगी व्यक्तीस अनोफेलिस प्रकारच्या मादी डास चावल्यानंतर होतो तसेच हिवतापाची लक्षणे,उपचार व नियंत्रण या विषयी माहिती दिली डॉ. संजय माने तालुका आरोग्य अधिकारी यांनी कोरडा दिवस पाळण्याचे महत्त्व समजावून सांगितले. कोरडा दिवस पाळण्याने डासांचे जीवन चक्र बाधित होते व डास उत्पत्ती होत नाही व आपण आपला कीटकजन्य आजारापासून बचाव करू शकतो असे सांगितले.
तसेच डॉ. कविता कवीश्वर जिल्हा हिवताप अधिकारी यांनी पाणी साठवण्याची भांडी दर तीन ते चार दिवसांनी घासून पुसून उन्हात वाळवावी तसेच पाण्याच्या साठ्याची झाकणे नेहमी बंद ठेवावी,घराच्या सभोवताली असणारी पाण्याचे डबके,खड्डे वाहती करावी,ज्या ठिकाणी पाणी वाहते करता येत नसेल अशा ठिकाणी डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावे,रात्री झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करावा असे सांगितले.
सदरील कार्यक्रम मध्ये नागरिकांना डासाच्या अळ्या, गप्पी मासे,मच्छराच्या प्रजाती याचे नमुने दाखवण्यात आले. या वेळी प्रभात फेरी काढणायत आली रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये सर्व आरोग्य कर्मचारी यांनी भाग घेतला.