– उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भारतीय लष्कराच्या शौर्य संध्येचे उद्घाटन
नागपूर :- भारतीय लष्कर हे देशाच्या सर्व सीमांचे शत्रुंपासून रक्षण करुन विकसित भारताच्या वाटचालीत मोलाचे योगदान देत आहे. नागपूर शहरात आयोजित लष्कराचे विशेष प्रदर्शन आणि शौर्य संध्येतून तरुणांनी प्रेरणा घ्यावी व लष्कारात दाखल होवून देश सेवा करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
भारतीय लष्कराच्यावतीने मानकापूर स्टेडियमवर आयोजित प्रदर्शनात ‘शौर्य संध्या’ या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, भारतीय लष्करात निडरता, स्वाभिमान आणि देशप्रेमाचा प्रेरक संगम दिसून येतो. आत्मनिर्भर भारताची संकल्पना प्रत्यक्षात येत भारतीय लष्कारात नव्या दमाची देशात तयार झालेली सैन्य सामुग्रीची निर्मिती होत आहे. शत्रुंपासून भारतीयांचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र पहारा देणाऱ्या लष्कराचे जवान हे भारतीयांचा अभिमान आहेत. प्रत्यक्ष युद्ध भूमीवर लष्कारातर्फे करण्यात येणारी कौशल्यपूर्ण कार्यवाही बघण्याचा योग लष्काराच्या शौर्य संध्या या कार्यक्रमातून आला असून ही तर शौर्य वंदनाच असल्याचे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले. लष्काराची प्रदर्शनी व शौर्य संध्या या विशेष कार्यक्रमातून सादर होणाऱ्या विविध प्रात्यक्षिकातून तरूणांनी प्रेरणा घेवून लष्करात दाखल व्हावे व देश सेवा करावी असेही त्यांनी सांगितले.
‘भारतीय सेना प्रेरणा का प्रतिक’ या संकल्पनेवर आधारित शौर्य संध्येचे यावेळी फडणवीस यांच्या हस्ते मिनी फ्लेयर करून उद्घाटन झाले. यात सर्वप्रथम हेलिकॉप्टरचा फ्लाय पास झाला.अश्व, श्वान आणि बायकर्सचे आकर्षक पथसंचलन झाले. लष्कराच्या चार रेजीमेंटनी यावेळी चित्तथरारक कवायती सादर केल्या.फाईट बँडनेही उत्तम पथसंचलन व बॉक्स फॉर्मेशन करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी पॅराशुट,ड्रोनद्वारे विविध प्रात्यक्षिके झाली.
भारतीय लष्कराच्यावतीने आयोजित हे विशेष प्रदर्शन २ ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान सर्व सामान्य जनतेसाठी खुले राहणार आहे.