संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे ग्रीन क्लबचे दिनांक १४ सप्टेंबर 2023 रोजी उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.मनीष चक्रवर्ती, हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.रेणू तिवारी ह्या होत्या. विचारपीठावर ग्रीन क्लबच्या संयोजक डॉ.रश्मी जाचक,समन्वयक डॉ. महेश जोगी, लेफ्टनेंट मोहम्मद असरार, डॉ. तारुण्य मुलतानी,सा.प्रा.सुरज कोंबे, डॉ. प्रियंका भोयर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रीन क्लबचे समन्वयक डॉ.महेश जोगी यांनी केले. त्यात त्यांनी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी ग्रीन क्लबचे सदस्य होऊन क्लबच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सा.प्रा.सुरज कोंबे यांनी आपल्या भाषणातून ग्रीन क्लब हे विद्यार्थ्यांसाठी कसे वरदान आहे हे समजावून सांगताना म्हटले की, ग्रीन क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा सखोल असा अभ्यास करण्याची सुवर्णसंधी आहे. शिवाय हा उपक्रम महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ यांचा असल्यामुळे या दोन संस्थांशी जुळण्याची सुद्धा संधी विद्यार्थ्यांना या क्लबच्या माध्यमातून मिळू शकते. ह्या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासनाचे विविध सर्टिफिकेट प्राप्त करता येतात आणि ते सर्टिफिकेट त्यांच्या भविष्यासाठी उपयोगात येऊ शकतात असे सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी कशा महत्वपूर्ण आहे. ते समजून घेण्याची संधी चांगल्या प्रकारे आहे. जसे पाणीबचत, पर्यावरण समतोल, परिसराची स्वच्छता, आरोग्यांची निगा राखणे, इत्यादी छोट्या छोट्या गोष्टींमधून आपला स्वतःचा तर विकास करायचा आहे सोबतच आपल्या गावाचा, जिल्ह्याचा, राष्ट्राचा विकास सुद्धा साध्य करता येऊ शकतो असे सांगितले.ग्रीन क्लबच्या संयोजक डॉ. रश्मी जाचक यांनी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या ग्रीन क्लबमध्ये सदस्यत्व स्वीकारावे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. मनिष चक्रवर्ती यांनी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या क्लबमध्ये सहभाग नोंदवून आपले राष्ट्राप्रती असलेले उत्तरदायित्व छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी मधून सिद्ध करावे असे सांगितले. तर लेफ्टनंट कर्नल मोहम्मद असरार यांनी शासनाच्या सर्टिफिकेटचे महत्व काय असते ते त्यांनी आपल्याकडे असलेल्या nss च्या युनिटच्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.या कार्यक्रमाच्या दरम्यान ग्रीन क्लबचे नवनियुक्त अध्यक्ष मुजम्मील हुसेन याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच उपाध्यक्ष समीक्षा बादुले हिचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन समीक्षा बादुले ह्या विद्यार्थिनींनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. तारुण्य मुलतानी यांनी केले.
या कार्यक्रमासाठी ग्रीन क्लबचे सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते.सोबतच महाविद्यालयातील डॉ. संजीव शिरपुरकर,डॉ. नितीन मेश्राम, डॉ. रेणुका रॉय,डॉ. अझहर अबरार, डॉ. यशवंत मेश्राम, एन.एस.एस.अधिकारी डॉ. विनोद शेंडे,डॉ. विकास कामडी हे प्राध्यापक आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी गिरीश संगेवार, विलास पजई , वेंकट, सीमा पाटील, पूर्वी कडबे, विक्की समुद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले होते.