– सभाकक्षात गुणात्मक व सुसज्ज सुविधा
नागपूर :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील हायकोर्ट बार आसोसिएशच्या सुमारे आठ हजार चौरस फुट जागेत बांधण्यात येणाऱ्या बार सभाकक्षाचे आज भूमिपूजन झाले.
नागपूर उच्च न्यायालयाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमास न्यायमुर्ती (प्रशासकीय) अतुल एस. चांदुरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी न्यायमुर्ती अनिल सांबरे, अविनाश घरोटे, अनिल किलोर, मुकालीका जवळकर, उर्मिला जोशी, जी. ए. मेननाजीस, जी.ए. सानप, ए.एल. पानसरे,वृषाली जोशी, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे आदी उपस्थित होते.
नागपूर खंडपीठातील विस्तारीत साऊथ विंग येथे बार असोसिएशनच्या सुमारे 8 हजार 227 चौरस फुट टेरेसच्या जागेवर सभाकक्ष बांधण्यात येणार आहे.या बांधकामासाठी 317 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. या कक्षामध्ये 55 कर्मचारी बसण्याची व्यवस्था, माहिती कक्ष, प्रशस्त स्वतंत्र दालने त्यासोबत बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसाठी सार्वत्रिक आसन व्यवस्था राहणार आहे. बार काँसीलच्या सदस्यांना दैनंदिन कामासाठी आवश्यक असलेल्या सुविधा या सभाकक्षात पुरविण्यात येणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायकोर्ट बार असोसिएशनसाठी बांधण्यात येणाऱ्या सभाकक्षाची माहिती जाणून घेतली. बार काँसीलच्या सभासदांना येथे गुणात्मक व सुसज्ज सुविधा उपलब्ध होतील या दृष्टीने बार काँसीलच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. या कामासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
ॲड. अतुल पांडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, न्या. अतुल एस. चांदुरकर यांचे शाल व रोपटे देऊन स्वागत केले. भूमिपूजनासाठी बसविण्यात आलेल्या कोनशीलेचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी सिनीयर काँसीलर कुमकुम शिरपूरकर, ए.एच. देशपांडे, सुरेंद्र मिस्त्रा, कप्तान खापरे समर्थ, हायकोर्ट बार असोसिएशनचे सचिव अमोल जलतारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुचेवार उपस्थित होते.
शासकीय अभियोक्ता कार्यालयास भेट
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील शासकीय अभियोक्ता कार्यालयास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी शासकीय अभियोक्ता ए. एम. देशपांडे यांनी उपमंख्यमंत्र्यांचे स्वागत केले. शासकीय अभियोक्ता कार्यालयाच्यावतीने सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.
अतिरिक्त शासकीय अभियोक्ता आनंद फुलझेले, देशाचे उपमहाधिवक्ता नंदेश देशपांडे, बार काँसीलचे पारिजात पांडे, तसेच सहायक शासकीय अभियोक्ता यावेळी उपस्थित होते.