मुंबई :- मुंबई विभागातील सीजीएसटी बेलापूर आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी बनावट जीएसटी इनव्हॉईस टोळीचा छडा लावला आहे. सुमारे 147 कोटी रुपयांचे बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी ) मिळवण्यासाठी या 817 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या वापरण्यात आल्या. मेसर्स ध्रुविका केमिकल्स ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स निकोलासा ट्रेडिंग प्रा. लि., मेसर्स जे बी डायकेम प्रा. लिमिटेड चा संचालक आणि याच्या सूत्रधाराला अटक केली आहे.
या समूहाच्या विरोधात, वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी आणि विक्री/पुरवठा न करता, केवळ पावत्या प्राप्त करण्यात आणि जारी करण्यात गुंतलेले असणे,त्याद्वारे उलाढाल वाढवण्याच्या आणि बँक कर्जाचा लाभ घेण्यासाठी तयार केलेल्या बनावट कंपन्यांमध्ये अपात्र इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणे आणि मंजूर करणे यासंदर्भात चौकशी सुरु करण्यात आली आहे. शोध घेतल्यानंतर असे आढळून आले की ,या केलेल्या कंपन्या संबंधित परिसरात कार्यरत नाहीत किंवा अस्तित्वात नाहीत.
या कंपन्यांच्या समूहाने 817 कोटी रुपयांच्या बोगस पावत्या जारी केल्या होत्या आणि फसवणूक करून 147 कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी दावा केला होता/ मिळवला होता आणि तत्सम बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट आपापसात किंवा अस्तित्वात नसलेल्या विविध कंपन्यांना दिल्याचे तपासात उघड झाले आहे.वरील पद्धतीचा अवलंब करून त्यांनी सुमारे 127 कोटी रुपयांच्या बँक कर्जाचाही अपहार केल्याचे दिसून येते.
चौकशी दरम्यान गोळा केलेले प्रत्यक्ष पुरावे, सादर केलेली विवरण पत्रे आणि नोंदवण्यात आलेल्या तथ्यांनुसार , सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल 18/08/2023 रोजी संचालकाला सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली. त्याला 18/8/2023 रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय बेलापूर येथे हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची म्हणजे 31/08/2023 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे .
2022-23 या आर्थिक वर्षात, सीजीएसटी बेलापूर आयुक्तालयाने 628 कोटींची जीएसटीची कर चुकवेगिरी शोधून काढली, 270 कोटी वसूल केले आणि करचुकवेगिरी करणार्यांना तिघांना अटक केली.संभाव्य फसवणूक करणाऱ्यांना ओळखण्यासाठी आणि शोधण्यासाठी सीजीएसटी अधिकारी डेटा विश्लेषण साधनांचा वापर करत आहेत.हे प्रकरण सीजीएसटी मुंबई क्षेत्राने करचुकवेगिरी करणारे आणि बनावट आयटीसी नेटवर्कच्या विरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे.