नागपूर :- महावितरणच्या मौदा विभागांतर्गत असलेल्या तरोडी शाखा कार्यालयाने अवघ्या 8 तासात 5 नविन वीज जोडणी देत ग्राहकांकडून कौतुकाची थाप मिळविली आहे.
तरोडी परिसरातील स्वप्निल करवाडे (प्रधानमंत्री आवास योजना, तरोडी खुर्द) सुचिता ढेपे (प्रधानमंत्री आवास योजना, तरोडी खुर्द), सरोज कुजरकर (जिजामाता नगर 4, तरोडी खुर्द), भाग्यश्री बोंद्रे (श्रावण नगर, तरोडी खुर्द) आणि पुष्पा देवी गुप्ता, (नागेश्वर नगर ,बीडगाव) या पाच ग्राहकांनी नवीन वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केला होता, या अर्जावर तात्काळ कारवाई करीत महावितरण कर्मचा-यांनी आवश्य्क ती प्रक्रीया पार पाडली या पाचही ग्राहकांनी आवश्यक शुल्काचा भरणा केल्यानंतर अवध्या 8 तासांत या पाचही ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली.
महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि नागपूर ग्रामिण मंडलचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनात कार्यकारी अभियंता रुपेश टेंभुर्णे, उपकार्यकारी अभियंता दामोदर उरकुडे, तरोडी शाखा केंद्राचे कनिष्ठ अभियंता पवन जाधव यांच्या उपस्थितीत या ग्राहकांना नवीन वीज जोडणि देण्यात आली. महावितरणच्या या कार्यतत्परतेबाबत आनंद व्यक्त करीत या ग्राहकांनी महावितरणप्रती आभार व्यक्त केले आहे.
महाल विभागातील ग्राहकाला देखील तत्पर वीज जोडणी
महाल विभागातील नवीन सुभेदार शाखा कार्यालयांतर्गत असलेल्या रुख्मिणी नगर येथील रहिवासी राकेश महादेव गोतमारे या ग्राहकाला देखील आवश्यक शुल्काचा भरणा केल्याच्या 24 तासांच्या आत नवीज वीज जोडणी देण्यात आली. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, संचालक (संचालन) संजय ताकसांडे, नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनात ग्राहकांनी नव्या वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी जागेची पाहणी करून किती शुल्क भरायचे याची माहिती देतात. त्यानुसार शहरी भागातील ज्या ग्राहकांनी शुल्क भरले त्यांना चोवीस तासात कनेक्शन देण्यावर भर देण्यात येत असून ग्रामीण भागासाठी अंतर व इतर अडचणी लक्षात घेऊन 48 तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना झटपट कनेक्शन
कृषी ग्राहकांना वीज कनेक्शन देणे हे तुलनेने अवघड असते. शेतामध्ये दूरवर असलेल्या विहिरीवरील कृषी पंपासाठी वीज कनेक्शन देण्यासाठी विजेचा खांब, वायर, ट्रान्सफॉर्मर अशा पायाभूत सुविधा अनेकदा उभाराव्या लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना जोडणी मिळण्यास विलंब लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी महावितरणने गेल्या वर्षभरात मोहीम राबविली. त्यातून निर्माण झालेल्या पायाभूत सुविधांमुळे शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी कनेक्शन देण्याचाही वेग वाढला आहे.