नागपूर, ता. १२ : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व युवा दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने निर्मित अंबाझरी ओव्हरफ्लो पॉईंट जवळील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याच्या खालील भागामध्ये स्वामींचे जीवन दर्शन घडविणाऱ्या प्रदर्शनीचे लोकार्पण बुधवारी (ता. १२) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी ही प्रदर्शनी नागरिकांसाठी सुरु झाल्याची घोषणा केली.
याप्रसंगी उपमहापौर मनीषा धावडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, नगरसेविका वर्षा ठाकरे, नगरसेविका डॉ. परिणिता फुके, नगरसेवक अमर बागडे, माजी नरसेवक विवेक तरासे, सहा.आयुक्त प्रकाश वराडे, उद्यान अधिक्षक अमोल चोरपगार, कार्य. अभियंता अनिल गेडाम, उप अभियंता जी.एम.तारापुरे, सामाजिक कार्यकर्ता संजय भेंडे आदी उपस्थित होते.
महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर शहरातील युवा पिढी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रातून प्रेरणा घेऊ शकतील या उद्देशाने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शिनीचे उदघाटन तथा लोकार्पण करण्यात आले. स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याच्या खालील भागामध्ये स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण जीवनचरीत्र दर्शविणारे म्यूरल लावण्यात आलेले आहेत. प्रत्येक म्यूरलखाली एक टिव्ही स्क्रीन आणि हेडफोन आहेत. या टिव्ही स्क्रीनवर स्वामी विवेकानंदांच्या जीवनावरील अनेक प्रसंगांच्या कथा दृकश्राव्य माध्यमात पाहता आणि ऐकता येणार असल्याचेही यावेळी महापौरांनी सांगितले.
सदर मल्टिकलर म्युरल नागपूरच्या कलाकारांनी तयार केले आहे. याठिकाणी १७ टीव्ही स्क्रिन लावण्यात आलेल्या असून प्रत्येक स्क्रिनवर एकाच वेळी वेगवेगळ्या कथा पाहता व ऐकता येणार आहेत. मद्रास रामकृष्ण मिशनने स्वामीजींच्या जीवन चरित्रावर एक डिजिटल स्टोरी तयार केली आहे. ज्यामध्ये ३६ कथांचा समावेश आहे. यामध्ये मराठी आणि हिंदी भाषा निवडण्याचा पर्याय सुद्धा आहे. त्यामुळे आपल्या भाषेत या कथा पाहता येणार आहेत. प्रत्येक स्क्रिनजवळ तीन हेडफोन्स ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे एकाच वेळी ५१ युवक स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्राला पाहू आणि समजू शकतील, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिली. नागपूरच्या सर्व जनतेने कोरोना नियमांचे पालन करून या प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले.