– दर महा वेतनात ४.७५% इएसआयसी कपात पण कामगार वंचित
– राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भुषण चंद्रशेखर यांची मागणी
नागपूर :-नुकतेच बारामती येथे केंद्र सरकारने शंभर बेडचे इएसआयसी रुग्णालय मंजूर केले आहे. त्याच धर्तीवर कोराडी येथील महानिर्मितीने सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत ७ ते ८ वर्षापूर्वी आरोग्याच्या दृष्टीने दवाखाना बांधला आहे. त्याठिकाणी ‘’इएसआयसी रुग्णालय’’ उभारावे. अशी विनंती पूर्वक मागणी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांनी निवेदनातून केली आहे.
महानिर्मिती कोराडी औष्णिक वीज केंद्र व खापरखेडा औष्णिक वीज केंद्र या मोठ्या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची संख्या अवाढव्य आहे. कोराडी येथील दवाखाना दत्ता मेघे मेडिकल कॉलेज व शालिनीताई मेघे रुग्णालय तथा रिसर्च सेंटर हॉस्पिटल यांचेमार्फत ‘ट्रेनिंग सेंटर’ म्हणून कार्यरत आहे. यातून सामान्य जनतेला वा कंत्राटी कामगारांना कोणताही लाभ नाही. असे भुषण चंद्रशेखर यांनी निवेदनातून सांगितले.
कोराडी, महादुला व दोन्ही वीज केंद्राच्या परिसरातील गावामधील प्रकल्पग्रस्त, स्थानिक नागरिक व कंत्राटी कामगारांचे आरोग्याच्या दृष्टीने दवाखान्यात लागणारे उच्चस्तरीय संसाधने उपलब्ध आहेत. कोरोना काळात या दवाखान्याचा कोणताच लाभ सामान्य जनतेला झाला नाही. हा दवाखाना सेवाभावी वृत्तीने चालावा तसेच ग्रामीण भागातील महानिर्मिती ३x६६० कोराडी वीज केंद्र, २१० कोराडी वीज केंद्र, कोराडी प्रशिक्षण केंद्र, कोराडी विस्तारित प्रकल्प, स्थापत्य बांधकाम सर्कल, महानिर्मिती विशिष्ट विश्राम गृह कोराडी तसेच खापरखेडा औष्णिक वीज केंद्र, त्याचप्रमाणे कामठी, सावनेर या तालुक्यांतील इतर मोठ्या औद्योगिक वसाहती, नागपूर तालुक्यांतील गोधनी, बोखारा येथील औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांना कोराडी येथे इएसआयसी रुग्णालयाचा लाभ घेण्यास सोयीस्कर जाईल. या निवेदनाला मंजुरी मिळावी. आजपर्यंत कोराडी व खापरखेडा वीज केंद्रांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कोराडी येथील महानिर्मिती रुग्णालयाचा फायदा झाला नाही. असे भुषण चंद्रशेखर यांनी सांगितले.
निवेदनाची प्रत इमेल द्वारे महानिर्मिती चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म.रा.वी.नि.कं.मर्या., मुंबई व मा. संचालक (संचलन )म.रा.वी.नि.कं.मर्या.मुंबई, मुख्य अभियंता कोराडी व खापरखेडा वीज निर्मिती केंद्र, यांनाही पाठविण्यात आली आहे.
“महानिर्मिती कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक उपचारासाठी उच्चस्तरीय हॉस्पिटलची सुविधा आहे. पण कंत्राटी कामगारांना आरोग्यसंबंधी असुविधेपोटी प्राण गमवावा लागतो. हे चित्र बदलले पाहिजे.”
– भुषण चंद्रशेखर,
जिल्हा उपाध्यक्ष, नागपूर (ग्रा), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्र परिसरात कामगारांच्या आरोग्याची समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी कामगार विम्याचा दवाखाना (ईएसआयसी) उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शासनाने मदत करावी.
– उषा रघुनाथ शाहू अध्यक्ष, कामठी-मौदा विधानसभा क्षेत्र,
राष्ट्रवादी महिला काँग्रेस
वीज केंद्राजवळ कामगार विम्याचा दवाखाना (ईएसआयसी) असणे ही काळाची गरज आहे. कामगारांना कर्ज काढून उपचार घ्यावे लागते.
संदीप माटे कंत्राटी कामगार,कोराडी वीज केंद्र