नागपूर : राज्यात काही भागात गोवर (मीझल्स) ची साथ पसरत असल्याने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गोवर संसर्गापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर शहरातील बालकांचे प्रतिबंधात्मक लसीकरण अभियान राबविण्यात आहे. आपल्याकडील सर्व ९ महिने ते ५ वर्ष बालकांचे सुटलेले गोवर लसीकरण करुन घ्यावे. असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार यांनी केले आहे.
मागील २ महिन्यापासून गोवर आजाराचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे. त्यामुळे बऱ्याच बालकांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उद्रेक सुरुच असून त्यामुळे बालकांचे मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे.
मिझल्स रुबेला लसीकरण मोहिम दुसरा टप्पा १५ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान राबविला जाणार आहे. तरी जनतेस आवाहन करण्यात येत आहे की, ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील बालकांचे गोवर (मिझल्स) लसीकरण झालेले नसेल अथवा सुटलेले असतील, त्यांनी या मोहिमे अंतर्गत आपल्या बालकांचे लसीकरण करुन घ्यावे.
गोवरची लक्षणे
ताप, सर्दी, डोळे लाल होणे, खोकला अशी सुरूवातीची लक्षणे असतात. त्यानंतर पुरळ उठायला सुरवात होते, ती कपाळा पासून व नंतर मान व हातपाय पर्यंत पसरते. गोवर हा गंभीर आजार आहे कारण हा इतर आजारांना निमंत्रण देतो. लहान मुलांना खोकल्याचा त्रास सुरु होतो व त्यामुळे घशाला सूज येते निमोनिया होऊ शकतो. गोवर झाल्यानंतर अ जीवनसत्व कमी होते त्यामुळे डोळ्याचे आजार होतात काही वेळा अंधत्व पण येते. कुपोषित बालकास हा आजार होण्याची जास्त शक्यता असते
काळजी घ्या हे करू नका
गोवर झाल्यास बालकाला इतरांपासून वेगळे ठेवले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी जाऊ देणे टाळा, बालकांना शाळेत पाठवू नये. कारण हा आजार अतिशय संसर्गजन्य आहे. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ल्या घ्यावा , घरच्या घरी उपचार करू नये, कडू निंबाचा पाला किंवा इतर कोणतेही घरगुती उपचारात वेळ घालवू नये. सर्व डॉक्टरांनी गोवर सदृश लक्षणे असणाऱ्या सर्व बालकाची माहिती महानरपालिका आरोग्य विभागास देणे आवश्यक आहे.
@ फाईल फोटो