जी-२० समूह देशांच्या पहिल्या विकास गटाच्या बैठकीला शानदार सुरुवात
मुंबई :- जी-२० समूह देशांच्या प्रतिनिधींच्या पहिल्या विकास विषयक कार्यकारी गटाच्या तीन दिवसांच्या बैठकीला मुंबई येथे प्रारंभ होत आहे. बैठकीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी हॉटेल ताज महाल पॅलेस तसेच गेटवे ऑफ इंडिया येथे सर्व प्रतिनिधींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जी२० परिषदेचे भारताचे शेरपा अमिताभ कांत, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, विविध देशांचे प्रतिनिधी, उद्योग जगतातील अग्रणी तसेच विविध देशांचे वाणिज्यदूत उपस्थित होते.
यावेळी ‘कलर्स ऑफ इंडिया’ या भारतातील विविध कलाप्रकारांवर आधारित कार्यक्रमाचे तसेच ‘महाराष्ट्रातील सण’ या विषयावरील सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राचे कोळी नृत्य, लावणी, गोंधळ आदी नृत्य प्रकारांची झलक दाखविण्यात आले. गेटवे ऑफ इंडिया येथे कार्यक्रमाचा समारोप झाला.
जी २० बैठकीसाठी आलेल्या विविध देशांमधील अतिथींच्या स्वागतासाठी मारिन ड्राइव्ह तसेच गेटवेच्या परिसरात रोषणाई करण्यात आली.