– राज्यपालांच्या हस्ते वेलनेस क्षेत्रातील उद्योजिक सन्मानित
मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक डिजिटल डिटॉक्स दिवस साजरा करण्यात आला तसेच वेलनेस (निरामय आरोग्य) क्षेत्रातील महिलांसह ३५ उद्योजकांना ‘सेलेब्रिटी आयकन पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
वेलनेस क्षेत्रातील उद्योजिका डॉ. रेखा चौधरी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोबाईल तसेच इतर इलेक्ट्रॉनिक व डिजिटल उपकरणांच्या अतिवापराच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक डिजिटल डिटॉक्स दिवस साजरा करण्यात आला.
डिजिटल तंत्रज्ञान उपकरणांच्या अतिवापरामुळे लोकांच्या आणि विशेषतः लहान मुलांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे जागतिक डिजिटल डिटॉक्स दिवस साजरा करणे व या विषयावर जनजागृती करणे आवश्यक आहे असे राज्यपालांनी सांगितले. वेलनेस क्षेत्रात महिलांनी केलेल्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करून राज्यपालांनी पुरस्कार प्राप्त उद्योजकांचे अभिनंदन केले. यावेळी वेलनेस क्षेत्रातील ५०० महिलांचा परिचय असणाऱ्या ‘विमेन इन वेलनेस’ या पुस्तकाच्या आवरणाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला लोढा फाउंडेशनच्या अध्यक्ष मंजू लोढा व्यासपीठावर उपस्थित होत्या. राज्यपालांच्या हस्ते काया क्लीनिक, एन्रिच सलून, लुक्स सलून, नॅच्युरल सलून, प्युमा रिसॉर्ट, यांसह वेलनेस क्षेत्रातील उद्योजकांचा सत्कार करण्यात आला.