नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या नागपुरात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेस उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. काँग्रेसनं डॉ. रविंद्र भोयर यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसं पत्रक काँग्रेसकडून काढण्यात आलं आहे. उमेदवार बदलाबाबत मागील दोन दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर आज अखेर काँग्रेसनं आपला उमेदवार बदलला आहे.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार बदलण्याचा प्रस्ताव हायकमांडकडं पाठवण्यात आला होता. त्यानंतर दिल्लीतून या निर्णयाला मंजुरी दिली. डॉ. रविंद्र भोयर ताकदीने निवडणूक लढत नसल्याचा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आरोप होता. अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन देण्यावर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचं एकमतही झालं होतं. मात्र, डॉ. रविंद्र भोयर यांनी या सर्व चर्चेचं खंडण करत, मीच काँग्रेसचा उमेदवार असून, उमेदवार बदलाचा कुठलाही प्रस्ताव हायकमांडकडं गेला नसल्याचा दावा केला होता.
दरम्यान,नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पक्षाकडून डॉ. रविंद्र भोयर यांना उमेदवारी जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी उद्या दि. 10 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. मात्र, आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात डॉ. रविंद्र भोयर यांनी ही निवडणूक लढवण्यासाठी असमर्थता दर्शविल्याचं समजतं. त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मान्यतेनं तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार मंगेस सुधाकर देशमुख यांना काँग्रेस पक्षाकडून पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. तरी या निवडणुकीतील मतदान करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांना तसंच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना या संदर्भात माहिती देण्यात यावी, असं पत्रक काँग्रेसकडून काढण्यात आलं आहे.