अजित पवार अस्वस्थेततून आरोप करत आहेत -भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सत्ता गेल्यामुळे अस्वस्थ आहेत, त्यांच्या पक्षात प्रचंड अस्वस्थता आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेते असल्याचे दाखविण्यासाठी ते काही तरी आरोप करत आहेत, असे सडेतोड प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिले.

ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील व भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर उपस्थित होते.

अजित पवार यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर केलेल्या आरोपांविषयी प्रतिक्रिया विचारली असता बावनकुळे म्हणाले की, राज्याचे गृहमंत्रीपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. ते कधीही सत्तेचा दुरुपयोग करत नाहीत. त्यांच्या कार्यकाळात राज्य सरकारने गुंडाराज संपविले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मात्र बलात्काऱ्याला संरक्षण देण्यात आले, गृहमंत्र्याला तुरुंगात जावे लागले, मंत्र्यांच्या बगलबच्च्यांना पोलीस सुरक्षा दिली, राज्यातील पोलिसांचे खच्चीकरण करण्यात आले, चांगल्या अधिकाऱ्यांना बाजूला केले, यामुळे अजित पवार यांना बोलण्याचा काही अधिकार नाही.

ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्ता गेल्यानंतर त्या पक्षात अस्वस्थता आहे. सत्तेसाठी अजित पवार यांनी केलेली खेळी योग्य होती की शरद पवार यांची चाल बरोबर होती यावरून त्या पक्षात संघर्ष चालू आहे. महाविकास आघाडीमध्येही अस्वस्थता आहे. त्या पक्षातील अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत. अशा अस्वस्थतेतून अजित पवार माध्यमांमध्ये जागा मिळविण्यासाठी आरोप करत आहेत.

लव्ह जिहादच्या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त करून ते म्हणाले की, लव्ह जिहादमध्ये हिंदू मुलींना पद्धतशीर फसविण्यात येते. लव्ह जिहाद रोखण्यासाठी सरकारने कडक कायदा करावा, असे आवाहन आपण पक्षतर्फे करत आहोत.

 

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com