– बोरडा (सराखा) येथील घटना
रामटेक :- तालुक्यातील ग्रामीण भागात वाघाचा धुमाकूळ वाढलेला दिसून येत आहे. नुकतेच नाहबी गावात वाघाने एका 65 वर्षीय इसमाला शिकार केल्याची थरारक घटना घडली होती. त्या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशातच बोरडा सराखा गावालगत असलेल्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या वासराला वाघाने जखमी केल्याची घटना घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बोरडा येथील रहिवासी कवडू चिंदू गजबे यांच्या शेतातील गोठ्यात 2 बैल, 2 गाय व 1 वासरू बांधले होते. अचानक अंदाजे रात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास वाघाने गोठ्यात शिरून वासराला शिकार बनविण्याचे प्रयत्न केले. मात्र वाघाला त्यात यश आले नाही. वासराच्या मानेला खूप मोठ्या प्रमाणात जखम झाली असून त्याचे उपचार सुरू आहे. मानेला खोलपर्यंत जखम असल्याने वासरु वाचेल याची शाश्वती फार कमी दिसून येत आहे. एकाएकी गावालगत असलेल्या शेतात येऊन वाघाने शिकार केल्याच्या घटनेने संपूर्ण बोरडा गाव देखील भीतीच्या वातावरणात असल्याचे चित्र आहे.
संबंधित घटनेची माहिती वनविभाग रामटेक यांना देण्यात आली.मनसर येथील क्षेत्र सहाय्यक गजानन शेटे,वनरक्षक राठोड,वनमजुर रामू कोकोडे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.
गंभीर सवरूपात जखमी झालेल्या वासराच्या उपचाराचा संपूर्ण खर्च वनविभागाने उचलावा अशी गरीब शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच गावाजवळच अशी घटना घडल्याने गावात भीतीचे वातावरण असून या वाघाचे देखील बंदोबस्त तात्काळ करण्यात यावे अशी मागणी यावेळी बोरडा ग्रामवासीयांनी प्रतिनिधीसमोर बोलतांना केली आहे.