हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडून आढावा

आवश्यक कामांचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे आदेश

नागपूर :-  महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 19 डिसेंबरपासून नागपूर येथे होणार असून, त्या दृष्टीने विधानभवन, परिसर, रविभवन, नागभवन, आमदार निवास आणि 160 गाळे आदींच्या पूर्वतयारीचा आढावा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज येथे घेतला. अधिवेशनाच्या निमित्ताने आवश्यक असलेल्या विविध सोयीसुविधांबाबतच्या कामांचा विस्तृत अहवाल येत्या पंधरा दिवसांमध्ये सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.

विधिमंडळाच्या मंत्री परिषद सभागृहात अध्यक्ष नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशनासाठी करावयाच्या व्यवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम व इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, अध्यक्षांचे सचिव महेंद्र काज, उपसचिव विलास आठवले, राजेश तारवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संजय दशपुते, अधीक्षक अभियंता दिनेश नंदनवार, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, कार्यकारी अभियंता (विद्युत) हेमंत पाटील, उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये, माहिती संचालक हेमराज बागुल, विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण, विधान मंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, अवर सचिव रविंद्र जगदाळे, अवर सचिव सुनील झोरे, माजी आमदार प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते.

या बैठकीत अध्यक्ष नार्वेकर यांनी संपूर्ण व्यवस्थेची बारकाईने माहिती घेतली. कोविड महामारीच्या काळात आमदार निवास आणि रविभवन येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले होते. कोविडमुळे डिसेंबर 2019 नंतर नागपूर येथे विधिमंडळाचे एकही अधिवेशन झाले नाही. त्यामुळे दरवर्षी अधिवेशनाच्या निमित्ताने विधानभवन आणि इतर संबंधित वास्तुंमधील सोयीसुविधांची देखरेख, डागडुजी आणि नूतनीकरण आदी कामे करण्यात आली नव्हती. त्यामुळे या परिसरातील सर्व कामांसह इमारतीच्या नुतनीकरणाचे अंदाजपत्रक तयार करुन ते तात्काळ सादर करण्याचे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सभागृह परिसरातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि उपसभापती आदी पीठासीन अधिकाऱ्यांसह मंत्र्यांच्या दालनातील आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा तपासून घेऊन अपेक्षित बदल, दुरुस्ती, डागडुजी करावी. काही ठिकाणी आवश्यक असल्यास नवीन यंत्रणा बसवावी. सभागृहातील विद्युत व आसन व्यवस्था, ध्वनीक्षेपण यंत्रणा, स्वच्छतागृहे आदी सुविधांबाबत आवश्यक ती कामे करण्यात यावीत, असे आदेश अध्यक्षांनी दिले.

अधिवेशनाच्या कालावधीत बंदोबस्तासाठी बाहेरुन मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी नागपुरात दाखल होतात. या सर्व कमर्चाऱ्यांसाठी आवश्यक ती निवासव्यवस्था आणि पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्याबाबतही त्यांनी अधिका-यांना सांगितले. या कर्मचाऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी तत्परतेने कार्यवाही करण्याचे त्यांनी संबंधितांना सांगितले.

दीर्घ कालावधीनंतर नागपूर येथे अधिवेशन होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधांचा काटेकोर आढावा घेऊन कामांचे नियोजन करावे. अधिवेशनाच्या कालावधीत शहरात येणाऱ्या लोकप्रतिनिधींसह अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोणतीही अव्यवस्था सहन करावी लागणार नाही, यासाठी सजग राहून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असे त्यांनी बजावले.

यापूर्वी हिवाळी अधिवेशनामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासव्यवस्था असलेल्या 160 गाळ्यांमध्ये चालणारी पाणी तापविण्यासाठी असणारी डिझेलवरील गिझर यंत्रणा ही प्रदूषण वाढविणारी होती. मात्र आता अद्ययावत आणि पर्यावरणस्नेही यंत्रणा बसविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने या बैठकीत सादरीकरण केले. या यंत्रणेची गरज लक्षात घेऊन त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही अध्यक्ष नार्वेकर यांनी संबंधितांना दिले.

बैठकीनंतर अध्यक्षांनी उपस्थित अधिकाऱ्यांसह दोन्ही सभागृहे, पीठासीन अधिकारी आणि मंत्री महोदयांच्या दालनासह विधानभवन परिसराची पाहणी केली. यानंतर रविभवन, 160 गाळे, आमदार निवास आदी वास्तुंची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

YIN Central and State Cabinet Members meet Governor Koshyari

Fri Sep 23 , 2022
Mumbai :- A group of 25 Central and State Cabinet members of the Sakal Group’s Young Innovators Network met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Thursday (22 Sept) The young members coming from various districts of the State presented a memorandum of demands to the Governor on the occasion. Central Ministry leader Divya Bhosale and State […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!