गुणवान कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक
नागपूर : यावर्षीचा महसूल दिन हा दृष्टिकोन बदलणारा दिवस म्हणून साजरा करण्याचा संकल्प करूया. लक्ष्मी मुक्ती योजनेमध्ये नागपूर जिल्ह्याला अव्वल करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज येथे केले. वर्षभर दमदार काम करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन आज सत्कार करण्यात आला.
महसुली वर्ष म्हणजे 1 ऑगस्ट ते 31 जुलै पर्यंतचा एक वर्षाचा काळ. महसूल कर्मचाऱ्यांसाठी 1 ऑगस्ट हा त्यामुळे महत्त्वपूर्ण दिवस. आजचा महसूल दिन जिल्हाधिकारी कार्यातील शानदार सोहळ्याने सगळ्यांच्या लक्षात राहिला. या महसूल दिनावर एका योजनेचे वर्चस्व होते. ती म्हणजे लक्ष्मी मुक्ती योजना. जिल्ह्यातल्या प्रत्येक सातबारावर पुरुषांसोबत स्त्रीचे नाव आलेच पाहिजे. यासाठी मतपरिवर्तन करून प्रयत्न करा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले.
आपल्या छोटेखानी भाषणामध्ये त्यांनी आपल्या मिळकतीला, स्थावर मालमत्तेला आपल्यानंतर याच ठिकाणी ठेवून जावे लागते. मात्र मागे राहणाऱ्यांच्या नावाने विशेषता घरातल्या महिलांच्या नावाने मालकी असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यामुळे माहिलांची नावे नोंदविणे ऐच्छिक असणारा विषय जिल्ह्यामध्ये मतपरिवर्तनातून अनिवार्य होईल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी महसूल कर्मचाऱ्यांनी जबाबदारी काय असते हे जिल्ह्यावर येणाऱ्या संकटांच्या वेळी, निवडणुकांच्या वेळी सिद्ध केलेले असते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांबाबत लोकांमध्ये प्रचंड विश्वास आहे. बदलत्या डिजिटल युगात आता जनतेला आपल्याकडून आणखी जबाबदारीची, पारदर्शितेची व गतीशिलतेची अपेक्षा आहे. त्यानुसार बदल स्वतःमध्ये करावा. तेव्हाच आपली सर्वमान्यता व प्रशासनातीत अग्रणी भूमिका कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. अशावेळी व्यवस्थापन या कलेमध्ये प्रशिक्षणाने प्राविण्य वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. त्यासाठी ‘मेडिटेशन ‘ सारख्या ज्ञानाचा देखील वापर करावा, प्रशिक्षण घ्यावे स्वतःला कायम अपडेट ठेवावे, असे आवाहन केले. निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार व महसूलचे सर्व कर्मचारी तसेच विविध संघटनाचे पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. तर स्थानिक स्वराज्य संस्थांचे सभापती, सदस्य आवर्जून उपस्थित होते. त्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन तहसिलदार चैताली सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन तहसीलदार राहुल सारंग यांनी केले.यावर्षीचे पुरस्कार विजेते महसूल कर्मचारी : शेखर घाडगे उपविभागीय अधिकारी, नागपूर शहर, हेमा बडे, उपजिल्हाधिकारी नागपूर,चैताली सावंत तहसीलदार संजय गांधी निराधार योजना मनपा क्षेत्र नागपूर, सचिन यादव तहसीलदार तहसील कार्यालय कळमेश्वर, टी. डी. लांजेवार नायब तहसीलदार उमरेड, उच्च श्रेणी लघुलेखक संजय गिरी जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर,राहुल भुजाडे मंडल अधिकारी तहसील कार्यालय मौदा. शेख मुजीब शेख जमील अव्वल कारकून तहसील कार्यालय नरखेड,अमोल कुमार पौळ महसूल सहाय्यक तहसील कार्यालय कामठी, रूपाली तायवाडे तहसील, नागपूर ग्रामीण,अनिल सव्वालाखे तलाठी तहसील कार्यालय हिंगणा, राजू निळकंठ मुनघाटे वाहन चालक उपविभागीय अधिकारी कार्यालय सावनेर, मोरेश्वर उताणे पोलीस पाटील तहसील कार्यालय काटोल, विजय एम्बडवार कोतवाल तहसील कार्यालय उमरेड.
‘लक्ष्मी मुक्ती योजने ‘मध्ये नागपूर जिल्हा अव्वल करणार महसूल दिनाला अधिकारी कर्मचाऱ्यांचा संकल्प
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com