आपत्ती व्यवस्थापनामध्ये अचूकतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : प्रधान सचिव असीम गुप्ता

आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन सचिवांनी घेतला आढावा

नागपूर  : आपत्ती व्यवस्थापनामध्ये अचूकता आवश्यक आहे. मानवी चुकांना या ठिकाणी वाव नाही. त्यामुळे अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन प्रधान सचिव तथा नागपूरचे पालक सचिव असीम गुप्ता नागपूर यांनी आज येथे केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज उच्चस्तरीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहामध्ये प्रधान सचिवांनी घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील मान्सून पूर्वतयारीचा आढावा घेतला. साधनसामुग्री, यंत्रसामुग्री, आंतरराज्य समन्वय, हवामानाचा अंदाज व आपत्ती व्यवस्थापनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश या विषयावर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्यतत्व हे अचूकता आहे. कोणत्याही मानवी चुकीमुळे खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन करताना अचूकता आवश्यक आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा. नागपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या व त्यांचा आंतरराज्यीय संबंध लक्षात घेता, हा समन्वय आणखी बळकट होणे, गरजेचे आहे, 2020 मध्ये आलेल्या महापुरात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची खातरजमा करण्याबाबत तसेच त्या महापुरातून मिळालेला अनुभव व वस्तुपाठाचा योग्यरीत्या वापर या काळात करण्यासाठीच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यावेळी वीज पडून मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत वीज पडून १२ जण मृत्यूमुखी पडले आहेत. प्रधान सचिवांनीही महाराष्ट्रात ही संख्या 63 वर गेली असल्याचे सांगितले. राज्य सरकार या संदर्भात अतिशय गंभीर असून वीजरोधक यंत्रणा कोणकोणत्या ठिकाणी उभारल्या गेली पाहिजे, या संदर्भातील प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले. अतिसंवेदनशील भागामध्ये नागरिकांच्या मोबाईलवर एसएमएस जाण्याबाबतची यंत्रणा विकसित करण्यात आली आहे, याची खातरजमा करण्याची सूचना त्यांनी दिली. आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आवश्यक असणारी साधनसामग्री मागवताना दीर्घकालीन नियोजन करण्यात यावे, यासंदर्भातील कंत्राट आधीच देऊन ठेवा. साहित्य नव्हते, म्हणून मदत झाली नाही, अशा पद्धतीची ओरड नको, हवामानाच्या अंदाज दुर्लक्षित करू नका. केंद्रीय जल आयोगाकडे वरचेवर माहिती मागण्याचे काम सातत्याने करा. तसेच आंतरराज्यीय समन्वय वाढवून माहिती आधीच उपलब्ध होईल, याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला जिल्हाधिकारी आर. विमला यांच्यासह सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, सैन्य दलाचे मेजर निखिल नांबियार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे बिपिन बिहारी सिंग, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई, अधीक्षक अभियंता एस. डी.सहारे, अमित परांजपे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गर्भधारणा व प्रसवपुर्वनिदानतंत्र कायद्याची कडक अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी आर. विमला

Fri Jul 8 , 2022
जिल्हा सल्लागार समितीची बैठक नागपूर : आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. नागपूर सारख्या शहरात प्रशासन, पोलीस व इतर विभागातील उच्चपदावर अनेक महिला कार्यरत आहे. परंतु अजूनही समाजात भ्रुणहत्येचे प्रमाण कमी झालेले नाही. गर्भधारणा व प्रसवपुर्व निदानतंत्र कायद्याची कडक अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात सर्वदूर जनजागृती करणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले. यासाठी मुलींना योग्य शिक्षण तसेच पालकांनाही याची जाणीव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!