– नागनदीप्रमाणेच पोहरा नदी प्रदूषण मुक्त करणार
– आयआयटीएमएस प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कार्यक्षम
– 1 हजार 300 कोटींच्या विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन
नागपूर :- दक्षिण सिवरेज झोनमधून वाहत असलेल्या सांडपाण्यामुळे पोहरा नदी अत्यंत प्रदूषित झाली आहे. या नदी मध्ये होणारे प्रदूषण कायम स्वरूपी बंद करण्यासाठी तसेच नैसर्गिक जलस्त्रोताचे बळकटीकरण करण्याकरिता 957 कोटी रूपयांचा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण सिवरेज झोनमधील सांडपाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे प्रतिपादन, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघात सुमारे 1 हजार 300 कोटींच्या विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सर्वश्री प्रविण दटके, डॉ.परिणय फुके, आशिष जसस्वाल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे, मनपाच्या अतिरीक्त आयुक्त आंचल गोयल, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदी उपस्थित होते.
पोहरा नदी प्रदुषण निर्मूलन प्रकल्पामुळे दक्षिण सिवरेज झोनमध्ये वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे, त्यामुळे नागनदीप्रमाणेच पोहरा नदी सुध्दा प्रदुषण मुक्त होईल. येथील सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर निघणाऱ्या पाण्याचा इतर प्रयोजनासाठी पुर्नवापर करणे शक्य होणार आहे. सिवरेज लाईनचा प्रश्न पूर्णपने सुटणार असल्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मदत होणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच अधिक सक्षम करण्यासाठी ‘इंटिलिजेंट इंटीग्रेटेड ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ सुरु करण्यात येत असून या व्यवस्थेमुळे शहरातील सर्व १६४ स्वयंचलित वाहतूक नियंत्रकाचे नुतनिकरण करण्यात येणार आहे. त्यांना मुख्य सर्व्हरशी जोडल्यानंतर वाहतुक नियंत्रण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल होणार आहेत. या बदलामुळे वाहतुकींच्या नियमांचे कठोरपणे पालन होवून वाहतुक सुरळीत होण्यास मदत होईल. या प्रणालीसाठी 197 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
शहरातील विविध विकास कामांमध्ये नवीन टाऊन हॉल इमारतीचे बांधकाम, बाळासाहेब ठाकरे प्राथमिक शिक्षण, कला व सांस्कृतिक केंद्राचे बांधकाम, कृत्रिम विसर्जन कुंड्याचे बांधकाम, शहरातील सौंदयीकरण, दक्षिण -पश्चिम क्षेत्रातील जयताळा व गायत्रिनगर जलकुंभाचे लोकार्पण तसेच चंद्रनगर, सर्वत्रनगर, वैभवनगर येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
शहराच्या सर्वच भागात चोवीस तास पाणी पूरवठा
नागपूर शहरातील नागरिकांना काही भागात चोवीस बाय सात पाणी पुूरवठा करण्यात येत असून शहरातील अपुर्ण जलकुंभाचे काम पुर्ण झाल्यानंतर येत्या चार महिन्यात सर्व शहराला चोवीस बाय सात पाणीपुरवठा सुरु करण्यात येईल. अशी माहिती केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
नागपूर शहर स्वच्छ व सुंदर व्हावे तसेच जल, वायू व ध्वनी प्रदर्शनापासून मुक्त करण्यासाठी सुमारे पाच हजार कोटींची कामे सुरु करण्यात येत आहेत. या कामांमुळे नागरिकांना चांगल्या सुविधा निर्माण होतील. शहरात लहान ड्रेनेज लाईन असल्यामुळे या व्यवस्थेत बदल करुन ही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठीचे कामे उच्च दर्जाची व्हावी तसेच नागनदी प्रदुषण मुक्त करण्यासोबत शहरातील नागरिकांनी सीएनजी व इलेक्ट्रीक वाहनांचा वापर करावा, असे आवाहन नितिन गडकरी यांनी केले.
प्रारंभी महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी यांनी प्रास्ताविकात विविध विकास कामांची माहिती दिली.
यावेळी रामबाग येथील झोपडपट्टीधारकांना कायम स्वरुपी पट्टे वाटप, शबरी आदीवासी घरकुल योजनेंतर्गत घराचे वाटप , आशासेविकांना मोबाईल वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन मनिष सोनी यांनी केले. तर आभार प्रदर्शन अतिरिक्त आयुक्त अजय चारखाणकर यांनी मानले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.