Ø महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना
Ø उपचार, शस्त्रक्रियांसाठी 371 कोटींचे सहाय्य
Ø योजनेत 1 हजार 356 आजारांना विमा संरक्षण
यवतमाळ :- आजारांवर फार मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील रुग्णांना हा खर्च परवडण्यासारखा नसतो. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेने अशा हजारो गरीब रुग्णांना फार मोठा आधार दिला आहे. या योजनेसह केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून तब्बल 1 हजार 356 प्रकारचे उपचार, शस्त्रक्रिया विनामुल्य केल्या जातात. रुग्णांना कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेतून 996 व केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे 360 असे 1 हजार 356 प्रकारचे उपचार, शस्त्रक्रिया विनामुल्य केल्या जातात. या उपचार, शस्त्रक्रियांसाठी लाभार्थी कुटुंबांना प्रति कुटुंब प्रति वर्ष मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी रक्कम 2 लाख 50 हजार इतक्या रकमेपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण विमा तत्त्वावर पुरविले जाते. इतर आजारासाठी 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण आहे. योजनेचा लाभ कुटुंबातील एकाला किंवा सर्व सदस्यांना घेता येतो.
जिल्ह्यात या योजनेंतर्गत खाजगी 21 व शासकीय 18 रुग्णालये संलग्न आहे. या रुग्णालयातील योजनेचे आरोग्य मित्र रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यांना योजनेची माहिती देऊन त्यांच्या कागदपत्रांची पुर्तता व नोंदणी करून घेतात. जिल्ह्यात या रुग्णालयांमध्ये आतापर्यंत 82 हजार 580 रुग्णांवर विनामुल्य उपचार, शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. यासाठी योजनेतून 371 कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या योजनेत समाविष्ठ रुग्णालयांमध्ये वॉर्डमधील खाटा, परिचारिका, विशेषज्ञ, भूलतज्ञ व वैद्यकीय अधिकारी यांचे शुल्क, तपासणी शुल्क, भुल, ऑक्सिजन, ऑपरेशन थिएटर व अतिदक्षता शुल्क, शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य, औषधे व द्रव्ये, कृत्रिम अवयव, रक्त संक्रमण, इन्प्लॉट, एक्स-रे व निदान चाचण्या, आंतररुग्णास भोजन, डिस्पोजेबल व कन्झुमेबल, वाहतुक आदी खर्च योजनेतून केला जातो. रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते घरी जाईपर्यंतचा तसेच उपचारादरम्यान काही गुंतागुंत झाल्यास त्यासह संपुर्ण उपचार विनामुल्य केले जातात.
योजनेच्या लाभासाठी पिवळी शिधापत्रिका, अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबे पात्र आहे. अवर्षणग्रस्त 14 जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे, शासकीय अनाथाश्रमातील मुले, शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिक, नोंदणीकृत पत्रकार व त्यांचे अवलंबित, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जिवित बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे योजनेच्या लाभासाठी पात्र आहे.