नागपूर :- भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय सोहळा आयोजित करण्यात आला असून उपमुख्यमंत्री राष्ट्रध्वजवंदन करतील व पोलीस दलाची मानवंदना स्वीकारतील.
सिव्हिल लाईन्स परिसरात स्थित विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित मुख्य शासकीय समारंभात फडणवीस याच्या हस्ते सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण होईल व यावेळी ते स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन संबोधित करतील. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव तसेच अधिकारी-कर्मचारी यांना फडणवीस सन्मानित करतील. तसेच, जिल्हा व महिला व बाल विकास विभागाचे अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान करतील. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) ‘स्पेस ऑन व्हिल्स’ विदर्भ दौऱ्याचे उद्धाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.
सायंकाळी ५.३० वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात विभागीय आयुक्त कार्यालया तर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभ आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.
तत्पूर्वी, सकाळी, ७.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. उच्च न्यायालयामध्ये न्यायालय परिसरात सकाळी ७.३० वाजता तर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये न्यायमंदीर इमारत येथे सकाळी ८.०० वाजता ध्वजारोहण होणार आहे. यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या नागपूर स्थित विविध कार्यालयांमध्ये स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण होणार आहे.