▪️ जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रुजू आदेश बहाल
नागपूर :- शासकीय सेवेमध्ये रुजू होण्याचे अनेक युवा-युवतींचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी कायद्याने आखून दिलेल्या अनेक प्रक्रिया व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर युवा-युवतींना संधी मिळते. महसूल सेवेतील महत्वाचा कणा म्हणून ज्या पदाकडे पाहिले जाते त्या तलाठी पदावर 75 युवा-युवतींना रुजू होण्याचे आदेश आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने बहाल करण्यात आले.
गुणवत्ता क्रमाने आलेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत त्यांच्या पसंतीक्रमाने त्या-त्या तालुक्यात रुजू आदेश देण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
बचत भवन येथे अत्यंत पारदर्शीपणे सर्वांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गुणवत्ता क्रमानुसार आलेल्या उमेदवारांशी संवाद साधला. त्यांनी मागणी केलेल्या ठिकाणाबाबत विचारविनिमर्श करुन स्पॉटवरच त्यांच्या पसंतीचा तालुका देत उमेदवारांना पारदर्शकतेचा प्रत्यक्ष धडा दिला.
खूप प्रयत्नानंतर मला ही संधी मिळाली. मध्यंतरी आमचा निकाल लागूनही इतर तांत्रिक कारणांमुळे नियुक्ती आदेश मिळायला विलंब झाला. असे असले तरी आज मला तलाठी पदाचे रुजू होण्याचे आदेश मिळाल्याने मी प्रचंड आनंदी आहे, अशी प्रतिक्रीया शिखा प्रेमचंद मानधाते या युवतीनी दिली.
माझा प्रवास अत्यंत संघर्षमय झाला आहे. मी माझी नोकरी व कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करीन, असा विश्वास चांदूरबाजार, अमरावती येथील विद्यार्थीनी वैशाली निभूटकर हीने दिली.