– एकूण ६६८३६ लाभार्थ्यांना व्यवसायाकरिता कर्ज वितरीत
नागपूर :- केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेचा नागपूर शहरातील ५४ हजार ९१२ लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील लाभ मिळाला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात समाज विभाग अंतर्गत दीनदयाळ उपाध्याय-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान योजनेद्वारे (शहर अभियान व्यवस्थापन कक्ष) करण्यात आलेल्या प्रयत्नातून निर्धारित लक्षापेक्षा अधिक लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविता आलेला आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे पहिल्या टप्प्यातील १० हजार रुपये कर्ज वितरणासाठी ४८ हजार ११३ लाभार्थी लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. मात्र या योजनेद्वारे सुमारे ५५ हजार लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात मनपाला यश आले आहे. यासोबतच दुस-या टप्प्यात १० हजार ११८ लाभार्थी आणि तिस-या टप्प्यात १८०६ लाभार्थी असे एकूण ६६ हजार ८३६ लाभार्थी योजनेमुळे लाभान्वित झालेले आहेत. पीएम स्वनिधी योजनेद्वारे पहिल्या टप्प्यात रोजगार उभारणीसाठी १० हजार रुपये कर्ज वितरीत केले जाते. वेळेत कर्जाची परतफेड केल्यास लाभार्थ्याला दुस-या टप्पयात २० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्जाची देखील योग्य वेळेत परतफेड केल्यास लाभार्थ्यांना तिस-या टप्प्यातील ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्यक केले जाते. तिनही टप्प्यातील कर्ज लाभार्थ्यांना बँकेद्वारे उपलब्ध करून दिले जाते, अशी माहिती समाज कल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे यांच्यामार्फत देण्यात आली.
कोव्हिड-१९ या जागतिक महामारीदरम्यान संपूर्ण देशात लॉकडाउन लावण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्यां सोबतच पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरित परिणाम पडला. या पथविक्रेत्यांना बळ देउन त्यांना पुन्हा नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळते भांडवल पतपुरवठा तातडीने प्रदान करण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत ‘पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम-स्वनिधी)’ योजना सुरु करण्यात आली. सदर योजना नागपूर महानगरपालिका क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली, ही माहिती समाज कल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे यांनी दिली.
नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांचे ४८११३ एवढे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. यासाठी संकेतस्थळावर विभागाकडे ८८९२१ अर्ज प्राप्त झाले. बँकेद्वारे लाभार्थ्यांच्या दस्तावेजांची छाननी करून त्यातून १८७७४ अर्ज अपात्र ठरविण्यात आले. पात्र ७०१४७ लाभार्थ्यांपैकी ५४९१२ लाभार्थ्यांना अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे. इतर अर्जांच्या संदर्भात आवश्यक प्रक्रिया सुरू आहे.