नागपूर :- नागपूर जिल्ह्यांतील 15 हजार 17 पर्यावरण स्नेही ग्राहकांनी छापील वीजबिलांना नकार देत महावितरणच्या गो-ग्रीन सेवेचा लाभ घेतला आहे. या ग्राहकांनी वीज बिलासाठी ई- मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महिन्याला प्रत्येक वीज बिलामागे 10 रूपयाची तर, वर्षाला 120 रूपयाची सूट देण्यात येते. गो-ग्रीन सेवेचा पर्याय स्वीकारणा-या नागपूर जिल्ह्यातील वीजग्राहकांनी वर्षभरात तब्बल 18 लाखांपेक्षा अधिकची बचत केली आहे.
पर्यावरणाचा -हास टाळण्यासाठी महावितरणकडून पर्यावरणपूरक गो ग्रीन योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये वीज बिलाच्या छापील कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएसचा पर्याय देण्यात येतो. महावितरणच्या गो-ग्रीन या पर्यावरणपूरक सेवेसाठी प्रोत्साहन म्हणून ग्राहकांना प्रती मासिक बिलात दहा रुपये सवलत देण्यात येते म्हणजेच ग्राहकाची वीजबिलात वार्षिक एकशे वीस रुपयांची बचत होते. वीज बिल तयार झाल्यानंतर लगेचच ई-मेल तसेच एसएमएसद्वारे दरमहा वीज बिल प्राप्त होणार असल्याने वीज ग्राहकांनी बील मिळताच मुदतीपूर्वी वीजबिलाचा भरणा केला तर त्यांना प्रॉम्प्ट पेमेंटसाठी अर्थात तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत मिळते.याशिवाय हे बिल भीम ॲप, गुगल पे, पेटीएम यासारख्या युपीआय किंवा बँकेच्या ॲपवरून किंवा महावितरणच्या वेबसाईटवरून असे ऑनलाईन पद्धतीने भरले तर पाव टक्का सवलत देखील मिळते.
बिलाच्या रंगीत प्रिंटची ही सोय
वीज ग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेल द्वारे प्राप्त झालेले दर महिन्याचे वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपी मध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू महिन्याचे वीज बिल मूळ स्वरुपात उपलब्ध असते. आवश्यकतेप्रमाणे वीज ग्राहकांना ते डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट घेण्याची सोय आहे.
‘गो ग्रीन’ होण्यासाठी काय करावे?
महावितरण गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जी. जी. एन या 15 अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरण मोबाइल अॅपद्वारे किंवा संकेत स्थळाच्या https://billing. mahadiscom.in/gogreen.php लिंक वर जाऊन करावी लागणार आहे. याबाबतची अधिक माहिती महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.