“देव तारी तया कोण मारी”
मोशे आता झालाय् तरुण
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवरील हल्ल्याची सुरुवात कुलाब्यातील ज्यूंचे सिनेगॉग असलेल्या नरिमन (छाबाड) हाऊसपासून केली. येथे 2 अतिरेक्यांनी 3 दिवसात 9 माणसे मारली. त्यात पुजारी (रबी) Gabriel Holtzberg आणि त्याची गरोदर पत्नी Rivka Holtzberg या दोघांचा बळी गेला. मात्र त्यांचा अवघ्या 2 वर्षांचा मुलगा Moshe Holtzberg केवळ दैवयोगाने बचावला. त्याची दायी Sandra Samuel हिने अत्यंत शिताफीने मोशेला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. ती मोशेसाठी “पन्ना दायी”च ठरली. तोच मोशे आज 17 वर्षांचा झाला आहे. विशेष असे की, मुंबई हल्ल्यातून बचावलेल्या अनेकानेक लोकांमध्ये मोशे हा सर्वात लहान भाग्यवान ठरला. या चमत्काराबद्दल Sandra ची भावना ही होती की, “प्रत्येकासाठी ईश्वराने आपली स्वत:ची एक योजना तयार केली असते. म्हणूनच बाळ मोशे आणि मी, आम्ही दोघेही त्या भीषण संकटातून वाचलो.” यालाच आपण म्हणतो- देव तारी त्याला कोण मारी.
मोशे 11 वर्षांचा असताना, 2018 च्या 18 जानेवारीला आईवडिलांच्या आईबाबांसोबत (दोन आजीआजोबा) मुंबईत आला होता. विमानतळावर उतरताच त्याने “शालोम… बहुत खुशी” असे उद्गार काढले. त्याच्या हस्ते नरिमन हाऊस मध्ये त्याच्या मातापित्याच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू जातीने हजर होते. छोट्या वाटणाऱ्या गोष्टीलाही इस्रायल किती महत्त्व देतो, याचा हा पुरावा. म्हणूनच हा चिमुकला देश सभोवताल शत्रुराष्ट्रांचा घेरा असूनही जिद्दीने लढत आहे. भविष्यात मोशेही याच जिगरीचा भाग होणार, यात शंका नाही. (येथे आठवतात इस्रायलचे एकेकाळचे प्रसिद्ध संरक्षणमंत्री मोशे दायान)
वास्तविक हा हल्ला भारतावर होता. परंतु त्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी दहशतवाद्यांनी ताज, ट्रायडेंट हे हॉटेल्स, Leopold Cafe, नरिमन हाऊस यांची मुद्दाम निवड केली, जेणेकरून परदेशी नागरिक मारले जाऊन त्यांच्या ‘बहादुरी’ला जागतिक प्रसिद्धी मिळेल. त्यातही, नरिमन हाऊस हे ज्यूंचे स्थान असल्याने इस्लामी अतिरेक्यांसाठी ते ‘आवडीचा’ विषय ठरले. परंतु, ईश्वराने मोशेला वाचवून एकप्रकारे त्यांची जिरवली. कारण, हाच मोशे उद्या इस्रायलचा सैनिक म्हणून हमासविरुद्ध लढणार आहे.
सीएसटीच्या छतावर लोकांना बंधक बनवून त्यांच्या हत्येचे जगापुढे व्हिडिओद्वारे थेट प्रक्षेपण करण्याची क्रूर योजना कसाब आणि इस्माईल यांना देण्यात आली होती, असे आम्हाला उच्च सूत्रांकडून कळले. परंतु, सीएसटी स्थानकात अनपेक्षितपणे झालेल्या विरोधाने ते भांबावले आणि वर जाणाऱ्या पायऱ्यांकडे येण्याऐवजी विरुद्ध दिशेला लोकलच्या पहिल्या प्लॅटफॉर्म वरून ओव्हरब्रीजवर गेले आणि टाइम्स आँफ इंडियाच्या कार्यालयाजवळून कामा हॉस्पिटल, मेट्रो चौक, विधानभवन मार्गे मरीन ड्राईव्हवर पोहोचले. या मार्गात त्यांनी खूप उधम केला आणि हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे हे पोलिस दलातील 3 मोहरे टिपले. परंतु, सीएसटी लाईव्हची त्यांची योजना सफल झाली असती, तर दहशतवादाचा अतिशय भीषण, कुरूप चेहरा जगाला दिसला असता.
(अपूर्ण, उद्या शेवटचे)
-विनोद देशमुख