मुंबई :- मुंबई सीमाशुल्क विभागाने स्थापन केलेल्या अंमली पदार्थ नाशक समितीने 19 जुलै 2023 रोजी 128.47 किलो वजनाचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट केला आहे. यामध्ये हेरॉइन (29.1 किलो), कोकेन (65.2 किलो), MDMA (2 किलो), गांजा (32 किलो), ऍम्फेटामाइन (43 किलो) यांचा समावेश होता. या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत 865 कोटी रुपये आहे. नवी मुंबईत तळोजा येथे असलेल्या धोकादायक कचरा प्रक्रिया साठवणूक आणि विल्हेवाट केंद्रात हा साठा जाळून नष्ट करण्यात आला.
या वर्षात अशा प्रकारे दुसऱ्यांदा अंमली पदार्थांचा मोठा साठा नष्ट करण्यात आला आहे. यापूर्वी 2 मार्च 2023 रोजी सुमारे 240 कोटी रुपये किमतीचे 61.585 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले होते.
टपाल मूल्यांकन विभाग (PAS), विशेष तपास आणि गुप्तचर शाखा (SIIB) आणि महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) यांसारख्या विविध संस्थांनी हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. भारतीय नागरिकांना सुरक्षित आणि निरोगी जीवनाची हमी देण्यासाठी मुंबई सीमाशुल्क विभाग अंमली पदार्थ आणि मनोवस्थेवर प्रभाव टाकणाऱ्या पदार्थांच्या (NDPS) बेकायदेशीर तस्करीविरोधात कायद्याची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे.