नागपूर : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपदा मित्र कार्यक्रम राबविण्यात येत असून राज्य सरकारने याकरीता 20 जिल्ह्याची निवड केली आहे. या कार्यक्रमातंर्गत नागपूर जिल्ह्यातील 14 तालुक्यामधून एकूण 500 स्वयंसेवकांची निवड करण्यात येत असून आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील विविध विषयावर 12 दिवसाकरीता निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
500 स्वयंसेवकांची विभागणी 5 बॅचेसमध्ये करण्यात येणार व प्रत्येक बॅचमध्ये 100 स्वयंसेवकांचा समावेश करण्यात येणार आहे. यशस्वी 12 दिवस निवासी प्रशिक्षणानंतर प्रत्येक आपदा मित्र स्वयंसेवकास खालील बाबी पुरविण्यात येणार आहे. आपत्कालीन किट (ज्यामध्ये लाईफ जॅकेट, ट्रॅव्हलिंग बॅग, फर्स्ट एड् बॉक्स, T-shirt, कॅप, गमबुट, टॉर्च, ईत्यादी साहित्य), आपदा मित्र प्रमाणपत्र, आपदा मित्र ओळखपत्र (I-Card), रुपये 5 लाखाचा जीवन विमा (लाईफ इन्शुरन्स 3 वर्षा करिता).
12 दिवस निवासी प्रशिक्षण
नागपूर शहरात निवासी प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. संपूर्ण निवासाची व भोजनाची निशुल्क व्यवस्था असेल, प्रवास खर्च देण्यात येईल. प्रशिक्षण जानेवारी किंवा फेब्रुवारी महिण्यात घेण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञ मंडळकडून संपूर्ण प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणामध्ये शिकविले जाणारे विषय
आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार, आपत्ती संरचना, आपदा मित्राची आपत्ती व्यवस्थापनामध्ये भूमिका, शोध व बचाव कार्य, प्रथमोपचार आणि समूदाय मुल्यांकन, BL.S. कृत्रिम श्वासोश्वास तंत्र CPR, इमर्जन्सी लिफ्टींग आणि क्याजूल्टी हलविण्याच्या पद्धती. फायर सेफ्टी, फायर उपकरणे हाताळणे, सर्पदंश संरक्षण, गर्दी व्यवस्थापन, CBRN, दोरी बचाव, नॉटस आणि हीचेस. पीपीई सुट आणि इतर सुट प्रणाली, पर्यावरण व हवामान बदल, पाण्यात बुडणे व संरक्षण, योगा,पथनाट्य, मनोरंजनाचे कार्यक्रम, दैनिक व्यायामासह अजून बरेच काही.
आपदा मित्र प्रशिक्षणाकरीता कोण नोंदणी करू शकतो
वयोगट 18 ते 40 या गटातील व्यक्ती (माजी सैनिक, सेवानिवृत्त वैद्यकीय व्यावसायिक, आदी करिता वयोमर्यादा निकष मध्ये शिथिलता), शिक्षण किमान 7 वी पास. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले असावे, आपसी प्रतिसाद कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करण्याचा पूर्वीचा अनुभव असेल तर त्यास प्राधान्य, आधार कार्ड अनिवार्य, नागपूर जिल्हाचा रहिवासी असणे आवाश्यक आहे.
यशस्वीरीत्या नोंदणी झाल्यानंतर आपणास संपर्क साधून प्रशिक्षणाचा दिनांक व ठिकाण बाबत कळविण्यात येईल. प्रशिक्षणाकरिता 12 दिवस निवासी राहणे शक्य असेल तरच नोंदणी करावी, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, सिव्हिल लाइन्स, नागपूर संपर्क क्र. 0712-256266 येथे संपर्क साधावा.
@ फाईल फोटो