नागपूर :- जिल्हाधिकारी कार्यालयात (Nagpur Collector Office) नवीन इमारत तयार करण्यात येणार असून ती ११ माळ्यांची असणार आहे. मेट्रो रेल्वेकडे (Metro Railway) या इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी देण्यात आली असून या नवीन इमारतीच्या आराखड्याचे सादरीकरण मंगळवारला जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच महसूल व इतर संबंधित सर्व विभाग आणण्यासाठी नवीन भव्य इमारत उभारण्याचे प्रस्तावित आहे. येथील शहर तहसील, सेतू, खनिकर्म तसेच उत्पादन शुल्क विभाग असलेली जुनी इमारत व संजय गांधी निराधार भवन तोडण्यात येणार आहे. प्रथम जी+६ अशी सात माळ्यांची) अशी इमारत तयार करण्याचे प्रस्तावित होते. बांधकाम विभागाने आराखडा तयार केला होता. मंत्रालयाकडून यात त्रुटी काढून तो परत पाठविला होता. नंतर यात सुधारणा करण्यात आली. परंतु माहिती योग्य प्रकारे देण्यात आली नसल्याने नव्याने आराखडा तयार करण्यात आला.
दरम्यान, शासनाने या इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी मेट्रो रेल्वेकडे दिली. नवीन इमारतीबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी सूचना केल्या होत्या. त्या सुचनेनुसार काही बदल करण्यात आले. या नवीन इमारतीचे सादरीकरण जिल्हाधिकारी यांच्यासमक्ष करण्यात येणार आहे. कोणत्या विभागाला किती जागेची गरज असून, किती मिळणार आहे, याचीही माहिती ते घेणार असल्याचे समजते.
अडीचशे कोटींची इमारत!
या इमारतीसाठी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी २०० कोटी देण्याची घोषणा २०२१ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. दीड वर्षांचा काळ होत असताना अद्याप एकही रुपया मिळाला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उप मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या इमारतीकडे लक्ष दिले असून, निधी वाढवून देण्यावरही सकारात्मता दर्शविली आहे. नवीन इमारतीवर अडीचशे कोटींचा खर्च येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.