– ‘येता संकट बालकावरी १०९८ मदत करी’
नागपूर :- संकटग्रस्त बालकांना त्वरित मदत पुरविण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्यावतीने चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ कार्यान्वित केला असून या सेवेचा संकटग्रस्त बालक किंवा या बालकास मदत करणाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास विभाग-नागपुरचे विभागीय उपायुक्त ऐ.जे. कोल्हे यांनी केले आहे.
बाल कामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरविलेली बालके, सापडलेली बालके, मतदीचे आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास त्यांना त्वरित आवश्यक मदत पुरविण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा १०९८ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीकरिता केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत ० ते १८ वर्ष वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी ही चाईल्ड हेल्पलाईन सेवा कार्यरत आहे.