-नागपूर रेल्वे स्थानकावर गाडीची झाडाझडती
-पाच पुरूषांसह दोन महिलां अटक
-आरपीएफ जवानाची सतर्कता
नागपूर – आरपीएफच्या पथकाने संशयाच्या आधारे गांजाची तस्करी उघडकीस आनली. आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळेच तस्करीचा प्रयत्न उधळला. विशेष म्हणजे जसवीर सिंह यांनी दाखविलेल्या सजगतेमुळे अंमली पदार्थ आणि आरोपी मिळून आले. संपूर्ण कारवाई नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून 9 बॅग जप्त करण्यात आल्या. त्यापैकी 8 बॅगमध्ये गांजा होता. 106.807 किग्रा अंमलीपदार्थाची किंमत 16 लाख रूपये आहे.
विशाखपट्टनम येथून आणलेल्या गांजाची खेप नवि दिल्लीला पोहोचविणार तोच आरपीएफच्या जाळ्यात अडकले. गांजा एका बोगीत आणि आरोपी दुसर्या बोगीतून प्रवास करीत असल्याने सुरक्षा पथकाला अंमलीपदार्थ मिळतो, परंतु आरोपी मिळत नाही. मात्र, आरपीएफ जवान जसबीरच्या सतर्कतेमुळे अंमलीपदार्थासह आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पथकाला यश मिळाले.
सोनम अहमद (25), मोहम्मद आसिफ (20), गुलफान उसमान (19), गुलशन शरीफ (35), सैफ अली अंसारी (22) आणि एक अल्पवयीन सर्व रा. नवि दिल्ली, विपिन सिंह रा. गाजियाबाद उत्तर प्रदेश अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या निर्देशानुसार अंमली पदार्थाची तस्करी करणार्यांच्या विरूध्द विशेष मोहिम राबविण्यात आली. त्याअंतर्गत 20805 विशाखपट्टनम नवि दिल्ली एक्सप्रेस नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर थांबली असता आरपीएफ निरीक्षक आर. एल. मीना यांच्या नेतृत्वात गाडीची झडती घेण्यात आली.
या पथकात आरक्षक जसवीर सिंह, अजय सिंह, मुकेश राठोड, सागर लाखे, नवीन कुमार, राजू मीना, महिला आरक्षक उर्मिला शर्मा यांनी एस-5 डब्याच्या बर्थ नंबर एकच्या खाली संशयाच्या आधारे विचारपूस करून चार बॅग जप्त केल्या. त्याच प्रमाणे बी-1 कोचच्या बर्थ नंबर 12 च्या खालून पाच बॅग जप्त केल्या. सोनम जवळ एक मोबाईल मिळाला. चार प्रवाशांजवळ रेल्वे तिकीट मिळाल्या. घटनास्थळी पंचनामा करून कायदेशिर कारवाई करण्यात आली. पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आले.