नागपूर : कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने मनपा क्षेत्रातील इयत्ता १ली ते ७वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास १० डिसेंबर २०२१ पर्यंत स्थगिती दिली आहे. कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन १० डिसेंबर नंतर याबाबत पुढील आदेश निर्गमित करण्यात येईल.मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी (ता. ३०) यासंबधीचे आदेश जारी केले आहे. मात्र मनपा क्षेत्रातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील.
महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहली ते सातवीच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात सूचना दिली होती. मनपा आयुक्तांनी कोरोना विषाणुची परिस्थिती लक्षात घेता शाळा सुरु करण्याचा निर्णयावर स्थगिती दिली आहे. मंगळवारी निघालेल्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णत: बंद राहतील. मात्र या वर्गांचे ऑनलाईन शिक्षण सुरु राहील.
सध्या कोरोना विषाणुचा नवा प्रकार “ओमायक्रॉन” आढळून आला असून जागतिक आरोग्य संघटना ने सदर विषाणु प्रकारास व्हेरीयंट आफ कंर्सन म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व कोविड नियमांचे पालन करावे आणि घराबाहेर पडताना मास्क, सतत सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखून व्यवहार करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केले आहे.