नागपूर विमानतळ येथे स्वागत, बाईक रैली व संविधान चौक येथे सभेचे आयोजन
नागपूर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सर्वाधिक ५ लाखांहून अधिक मते घेणारे कुणाल राऊत यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड घोषित करण्यात आली. २० मार्च रोजी दुपारी ३ वाजता त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन होणार आहे.
नागपूर शहरात आगमना निमित्त युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या विविध फ्रंटलच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांचा वर्षाव करित त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणारे आहे.
विमानतळ ते सविधान चौक पर्यंत बाईक रैली काढण्यात येणार असून या रैलीचे समापन संविधान चौक येथे सभेच्या रुपात होणार आहे.
कुणाल राऊत यांची युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड जाहीर होताच युवक काँग्रेसमध्ये राज्यभरात आणि नागपुरात आनंदाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, एन.एस.यु.आय., नागपूर शहर काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, सेवादल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र, संकल्प सेवाभावी सामाजिक संस्था व इतर संघटनेतील पदाधिकारी व कायर्कत्याकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी झाली आहे.
विमानतळ येथून स्वागत रैली हॉटेल प्राईड समोरुन – छत्रपती चौक अजनी चौक – लोकमत चौक – व्हेरायटी चौक येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ही स्वागत रैली संविधान चौक येथे संपन्न होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करतील तसेच या ठिकाणी स्वागत रैलीचे समापण होईल व कुणाल राऊत मान्यवरांचा उपस्थितीत सभेला संबोधित करणार आहेत.
या निमित्त आयोजित स्वागत समारंभा करिता विमानतळ येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान नागपूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष रत्नाकर जयपुरकर यांनी केले आहे.