नागपूर,दि.25: सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालयामार्फत आजादी का अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पंधरावाडयाचे आयोजन करण्यात आले. कुष्ठरोग मुक्तीकडे वाटचाल धोरणानूसार विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी कुष्ठरोगविषयी शपथ घेण्यात आली व नंतर मॅरॉथानचे आयोजन करण्यात आले. यावेळी कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्राचे सहाय्यक संचालक श्याम निमगडे व कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. भोजराज मडके यांच्या उपस्थितीत रनफार लेप्रसीला सुरुवात करण्यात आली. डॉ. संजय पुल्लकवार, डॉ. रविंद्र करपे, डॉ. स्नेहल मानेकर, डॉ. दिपीका साकोरे, डॉ, प्रतिभा बांगर यावेळी उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शाळा व महाविद्यालयात कुष्ठरोग एक सामाजिक समस्या व उपाय या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात येऊन विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. शहरी व ग्रामीण भागातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकासाठी निरंतर वैद्यकीय शिक्षण स्पर्धा आयोजित करण्यात आली. मुंबई येथील नामांकित कुष्ठरोग तज्ञ डॉ. विवेक पै यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तालुकास्तरावर कुष्ठरोग निदान व उपचार शिबीरे आयोजित करण्यात आली होते.