काळानुरूप बदलत जाणारी माध्यमे औचित्यपूर्ण ठरतात : हेमराज बागुल

-आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार दिनाला अभिवादन

नागपूर, दि.06 :  स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळ तसेच त्यानंतरही काळानुरूप ज्यांनी बदल स्वीकारले ती माध्यमे, ते माध्यम प्रतिनिधी आजही औचित्यपूर्ण आहेत. माध्यमे व माध्यम प्रतिनिधींनी काळानुरूप बदल स्वीकारणे अतिशय आवश्यक असल्याचे प्रतिपादन नागपूर अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल यांनी आज येथे केले.

            नागपूर जिल्हा माहिती कार्यालय व नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली व्यक्त केल्यानंतर उपस्थित मान्यवर माध्यम प्रतिनिधींना त्यांनी संबोधित केले.

            कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना पाळत नागपूर जिल्हा माहिती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुभाष वऱ्हाडे, विशेष अतिथी ज्येष्ठ पत्रकार विकास वैद्य,पत्रकार संघाचे पदाधिकारी संजय देशमुख, सुभाष राऊत, शोभा जयपुरकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांच्यासह माध्यमातील अन्य सदस्य उपस्थित होते.

            स्वातंत्र्यपूर्व समाजजागृतीपासून स्वातंत्र्योत्तर लोक प्रबोधनाचे कार्य माध्यमांनी केले. त्यानंतर स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये माध्यमे अग्रणी होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर देश उभारणीसाठी, त्यानंतर बदल स्वीकारण्यासाठी माध्यमांनी लढा दिला. माहिती तंत्रज्ञानातील विस्फोटानंतर माध्यमे अधिक गतिशील, नीटनेटक्या स्वरूपात पुढे आली. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी गती घेतल्याने प्रिंट माध्यमांमध्ये देखील अनेक बदल झाले. बदल ज्यांनी-ज्यांनी स्वीकारले ते स्पर्धेत टिकून राहिले. माध्यमे चिरतरुण आहेत. त्यांचे महत्त्व कधीच संपणार नाही. मात्र सृजनेतेसोबत एक डोळा बदलावर असणे आवश्यक आहे. शहर, ग्रामीण, महानगर, मुद्रीत, दृकश्राव्य, समाजमाध्यम असा कोणताही भेद न करता सर्व माध्यमांनी जगाच्या गतीने, तंत्रज्ञानाच्या क्रांतीप्रमाणे बदल करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

            माध्यमातील या बदलाकडे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लक्ष असून त्यानुरूप विभागाचे प्रगटीकरण होत आहे. पत्रकारांच्या सोयी, सवलती नव्या बदलाप्रमाणे देणे, माहितीच्या स्वरूपात बदल करणे, गतीशील माहिती पोहचविणे याकडे विभागाचे लक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी सुभाष वऱ्हाडे यांनी पत्रकारांच्या कोरोना काळातील जिगरबाज वृत्तीचे अनेक प्रसंग सांगितले. या काळात फ्रंटलाईन सोल्जर म्हणून ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांनी प्रशासनाला जागृत केले. यावेळी पत्रकारांच्या समस्या व सद्यस्थिती यावरही त्यांनी भाष्य केले. ज्येष्ठ पत्रकार विकास वैद्य यांनी संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक जिल्‍हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले तर कार्यक्रमाचे संचलन शोभा जयपूरकर यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

53 लाखाचा सुगंधित तंबाखू, पानमसाला व सुपारीचा साठा जप्त

Thu Jan 6 , 2022
नागपूर, दि.06 :   अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाच्या संयुक्त धाडीत जिल्ह्यातील विविध आस्थापनांवर प्रशासनाने धडक मोहीम राबवून प्रतिबंधित अन्न पदार्थ व सुपारीचा साठा जप्त केला. यामध्ये मे.जी.बी.गृह उद्योग, चिखली लेआऊट, कळमना येथून  33 लाख 13 हजार 340 रुपयाचा 12 हजार 894 किलो सुपारीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच अरुण कृष्णराव उमरेडकर, भुजाडे मोहल्ला, जुनी मंगळवारी., मोहम्मद साजिद शेख वल्द मोहम्मद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com