– सीआरपीएफच्या पश्चिम क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रणदीप दत्ता यांचे प्रतिपादन
– जनरल ड्युटीच्या 401 सीआरपीएफ जवानांच्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आणि शपथविधी नागपूरात संपन्न
नागपूर – केंद्रीय राखीव दलातील जवान भारताच्या नक्षलग्रस्त भागात तसेच संवेदनशील समजल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीर तसेच ईशान्य भारतात तैनात केले जातात. आपल्या देशाच्या आंतरिक सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते. केंद्रीय राखीव पोलीस दल भारताची अखंडता राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सीआरपीएफच्या पश्चिम क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रणदीप दत्ता यांनी आज केले.
सीआरपीएफ मधील जनरल ड्युटीचे 401 जवान आज हिंगणा नागपूर येथील ग्रुप सेंटरमधून उत्तीर्ण झाले , या तुकडीचा दीक्षांत समारंभ आणि शपथविधी आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ग्रुप सेंटर नागपूरचे उपमहानिरीक्षक पी. आर. जांभुळकर .उपस्थित होते.
तब्बल 44 आठवड्यांच्या बहुस्तरीय तसेच शिस्तबद्ध आणि कठोर प्रशिक्षणानंतर हे जवान या प्रशिक्षणामध्ये उत्तीर्ण होतात . सीआरपीएफ देशातील सर्वात मोठे सर्वात मोठे निमलष्करी दल असून अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी घेण्यासाठी या प्रशिक्षणानंतर जवानांना देशभरात तैनात केले जाते.
पासिंग आऊट परेड समारंभात रणदीप दत्ता यांनी सीआरपीएफ द्वारे पथसंचलनाचे निरीक्षण केले. पी.आर.जांभूळकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात प्रशिक्षणार्थींची तुकडीचा अहवाल सादर केला.
याप्रसंगी दत्ता यांच्या हस्ते विविध विषयात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थीं जवानांना ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्रातील कॉन्स्टेबल बडवाईक राहुल सुरेश यांना ऑल राऊंड बेस्ट ट्रॉफी देण्यात आली.
कॉन्स्टेबल इंगळे निखिल कान्हू यांना ड्रिलमध्ये ट्रॉफी , कॉन्स्टेबल इंगळे सागर रघुनाथ यांना फायरिंगमध्ये, कॉन्स्टेबल गिरे विशाल बबन यांना शस्त्र हाताळणीमध्ये, कॉन्स्टेबल पवार अंकुश शंकरराव यांना क्रीडा प्रकारात, कॉन्स्टेबल जगदाळे जयराम पांडुरंग यांना बीओएसीमध्ये आणि आउटडोअरमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी तर कॉन्स्टेबल रामेश्वर मेंढे यांना इनडोअरमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी ट्रॉफी देण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी सीआरपीएफ जवानांनी निशस्त्र लढाई , समन्वयीत कवायती तसेच मार्शल आर्टच्या प्रात्यक्षिकाचे प्रदर्शन उपस्थितांसमोर केले. या कार्यक्रमादरम्यान सीआरपीएफ ग्रुप सेंटरचे अधिकारी , प्रशिक्षणार्थी जवानांचे कुटुंबीय सध्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.