ऊस शेती शाश्वत समृद्धीचा महामार्ग

-कृषीभूषण संजीव माने  लक्षणीय ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान
नागपूर : ऊस पिकामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भरभराट झाली. विदर्भातही एकरी शंभर टनाच्यावर उत्पन्न घेतले जाऊ लागले आहे. लाभाची निश्चित हमी असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी ऊस शेतीची कास धरावी. हाच शेतकऱ्यांच्या शाश्वत समृद्धीचा महामार्ग असल्याचे प्रतिपादन कृषीभूषण संजीव माने यांनी आज येथे केले.
अॅग्रोव्हिजनच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात ऊस उत्पादकता आणि नफ्याची ऊस शेती विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. एकरी ११० टन ऊस उत्पादन घेणारे विदर्भातील पहिले शेतकरी राजेश भागल, मानस समूहाचे डॉ. समय बनसोड, समूहाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष जय कुमार वर्मा, आनंदराव राऊत, डॉ. रामदास आंबटकर, अनिल जोशी, भोजराम कापगते, सुधीर दिवे प्रामुख्याने उपस्थित होते.
संजीव माने यांनी ऊस पिकासंदर्भातील शास्त्रीय माहिती मांडली. १६ अंशाच्या खाली किंवा ३५ अंशाहून अधिक असे दोन्ही तापमान ऊस पिकाला मानवत नाही. यामुळेच विदर्भातील तापमान ऊसाच्यादृष्टीने हिताचे नाही. मात्र, आधुनिक तंत्राची जोड दिल्यास विदर्भातही ऊसाचे जोमदार उत्पन्न घेतले जाऊ शकते. विदर्भातील शेतकऱ्यांनी परिश्रमपूर्वक ही किमया करून दाखविली आहे. ऊसाचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. सततच्या प्रयत्नांद्वारेच एकरी १६८ टनांपर्यंत उत्पन्न घेता येऊ शकले आहे. लवकरच २०० टन उत्पन्नाचे लक्ष्याही निश्चित गाठू, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विदर्भातही एकरी १०० टन उत्पन्न सहज शक्य आहे. जमिनीची सुपिकता, योग्य पद्धतीने लागवड, योग्य प्रमाणात खत, पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि किड व प्राण्यांपासून संरक्षण ही ऊसाचे उत्पन्न वाढविण्याची पंचसूत्री त्यांनी दिली.
ऊसाचे एकरी ११० टन उत्पन्न घेण्याची किमया साध्य करणारे विदर्भातील पहिले शेतकरी राजेश भागल यांनीही त्यांची वाटचाल यावेळी उलगडली.  पारंपरिक पीक, संत्राबाग, भाजीपाला कशातही अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. सर्वच बिन भरोश्याचे ठरले होते. त्याच वेळी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी साधलेल्या समृद्धीचे कारण लक्षात घेत ३ एकरात ऊस शेती सुरू केली. मिळणारे यश पाहून हुरूप वाढला. आज संपूर्ण ४० एकर शेतीत केवळ ऊसाचीच लागवड केली असून समृद्धीचा मार्गही गवसला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भात तीन साखर कारखान्यांद्वारे स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी संधी निर्माण करून दिली आहे. आता शेतकऱ्यांनीही पारंपरिक मानसिकता बदलून ऊस शेतीकडे वळण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ऊस पिकाची कास धरल्या शिवाय शेतकऱ्यांचा कायापालट होणार नाही, असा मूलमंत्रच त्यांनी दिला.
लक्षणीय ऊस ऊत्पादन घेणारे सावनेर तालुक्यातील राजेश भागल यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील राजेश कवडे व सडक अर्जुनी येथील प्रभू डोंगरवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विदर्भातील सर्व भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी परिसंवादात सहभाग नोंदविला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाव्दारे प्रधानमंत्री आवास योजना

Sat Dec 25 , 2021
-नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाव्दारे प्रधानमंत्री आवास योजना (घटक क्र. ३) अंतर्गत ख.क्र. १२/१-२ मौजा वांजरी व ख. क्र. ६२ व ६३ मौजा तरोडी (खुर्द), येथील उर्वरीत २९८० घरकुलांची सोडत-२०२१ दिनांक १६.०८.२०२१ रोजी काढण्यात आली. नागपूर – या सोडतीमध्ये २९८० लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप करण्यात आले. त्यापैकी १५०८ लाभार्थ्यांनी दस्तावेजांची तपासणी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाव्दारे केलेली असून खसरा क्र. ६३ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com