राज्यात शेळी समन्वय योजना सुरू करण्याबाबत निर्णय

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केले स्वागत

 पोहरा येथे शेळी समूह योजना राबविणार

 नागपूर  : अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रात शेळी समूह योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासोबतच उर्वरित पाच महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी समूह प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आहे. शेळी समुहासंदर्भात पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी गेल्या काही वर्षांपासून सुरू केलेल्या पाठपुराव्याला ही शासकीय मोहोर लागली आहे. त्यामुळे आजच्या निर्णयाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

            नागपूर येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये राज्यातून मोठ्या प्रमाणात गोट फार्मिंगला चालना देण्याबाबत त्यांनी सूतोवाच केले होते. तसेच अमरावती व नागपूर विभागात मोठ्या संख्येने शेळी मेंढी विकास शक्य असून अरब देशांमध्ये कार्गो विमानाने शेळीची निर्यात येथील शेतकऱ्यांना आर्थिक बळ देऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. सध्या प्रातिनिधिक स्वरूपात या मागणीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

            मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या निर्णयात या योजनेसाठी 7.81 कोटी इतका निधी देण्यात येईल.  पोहरा प्रमाणेच राज्यातील उर्वरित 5 महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी समूह प्रकल्प राबविण्यास देखील मान्यता देण्यात आली.  राज्यातील शेळी पालनाचा व्यवसाय हा भूमीहीन ग्रामीण तसेच अल्पभूधारकांसाठी उपजीविकेचे महत्त्वपूर्ण साधन आहे. देशातील शेळ्यांच्या संख्येत महाराष्ट्र 6 व्या क्रमांकावर असून राज्यामध्ये उत्पादित होणाऱ्या दुधापैकी 2 टक्के हिस्सा शेळ्यांच्या दुधाचा आहे.  त्याचप्रमाणे एकूण मास उत्पादनाच्या 12.12 टक्के एवढे उत्पादन शेळीच्या मासांचे होते.

राज्यामध्ये अनेक भागात संसर्गजन्य रोगांमुळे शेळ्या रोगग्रस्त होऊन मरण पावतात.  गावातील स्थानिक जातीचे बोकड किंवा उपलब्ध असणारा कोणताही बोकड पैदाशीकरिता वापरला जातो.  मासांच्या वाढत्या मागणीमुळे कमी वयातील शेळ्यांची कत्तल होते व जातीवंत पशुधन उपलब्ध होत नाही.  त्यामुळे शेळी मेंढी पालन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्यामध्ये ही योजना राबविण्यात यावी अशी मागणी पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केली होती

            राज्यातील 106 लक्ष शेळ्यांपैकी अमरावती विभागात 13.33 लक्ष तर नागपूर विभागात 13.24 लक्ष एवढी शेळ्यांची संख्या आहे.  पोहरा येथे अविकसित भाग असल्यामुळे या ठिकाणी विकास कामे करण्यास मोठ्या प्रमाणावर संधी आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात या व्यवसायाला वाव आहे. तसेच स्वयंरोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर वाव आहे.  या ठिकाणापासून रस्ते, रेल्वे तसेच हवाई सुविधा जवळ आहे.

या योजनेअंतर्गत शेळी पालकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येऊन उत्पादक कंपन्याही स्थापन करण्यात येतील. शेळी पालकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात येतील.  याशिवाय शेळ्यांचे दूध व दुग्धजन्य प्रक्रीया केंद्र स्थापन करणे, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र व निवासस्थान, सामुहिक सुविधा केंद्र स्थापन करण्यात येतील. एक सकारात्मक सुरुवात झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

योगासने आणि सुंदर पथनाट्य चे सादरीकरण करून दिला नगरधन वासीयांना संदेश......

Thu Feb 17 , 2022
रविकांत रागीट महाविद्यालयाचा विशेष श्रम संस्कार शिबिर. रामटेक –  कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक संलग्नित रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय ,रामटेक  प्राचार्य रविकांत रागीट यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवसीय विशेष श्रम संस्कार शिबिर नगरधन येथे आयोजित करण्यात आले आहे यात ,  सहा.प्रा.अतुल गाळेराव (योग व समग्र स्वास्थ विभाग)क.का.स.वि. रामटेक यांनी योगासने प्राणायाम घेऊन समृध्द आरोग्यासाठी योगशास्त्र चे महत्व पटवून दिले, त्यानंतर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com