– आय.टी. एफ टेनिस स्पर्धेचे ना. केदार यांच्या हस्ते उदघाटन
नागपूर, दि. 1 : राज्याने क्रीडा धोरणास नेहमी प्रोत्साहन दिले आहे. या टेनिस स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी झाले आहेत. नागपूरने टेनिस खेळास प्रोत्साहन दिले आहे. देशातील सात मानांकित शहरांपैकी नागपूर टेनिस खेळाच्या बाबतीत एक आहे. स्पर्धात्मक वातावरणात सातत्य राहीले पाहिजे. त्याबरोबरच क्रीडा संकृतीचे जतन करणे आवश्यक आहे, असे राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. खेळात स्पर्धकांनी आकाशाला गवसणी घ्यावी, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए टेनिस अकॅडमी रामनगर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयटीएफ 15-के या राष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे आयोजन रामनगर येथे दि. 1 ते 6 मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन श्री. केदार यांच्या हस्ते आज पार पडले. आमदार डॉ. परिणय फुके, महापालिकेच्या नगरसेवक परिणीता फुके, अकॅडमीचे अध्यक्ष कुमार काळे, श्यामसुंदर अय्यर, विक्रम नायडू, सुधीर भिवापूरकर, शरद कन्नमवार, राजन नायर आदी यावेळी उपस्थित होते.
नागपूरच्या ऑल इंडिया प्रतियोगिता मानकापूर येथे झाली आहे. बालेवाडी येथेही स्पर्धेसाठी उत्कृष्ट वातावरण आहे. क्रीडा विभागाचे सहकार्य सर्व स्पर्धेस मिळत असते. त्यामध्ये सातत्य जोपासण्याची आवश्यकता असल्याचे श्री. केदार म्हणाले. आमदार परिणय फुके यांनीही स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
या टेनिस स्पर्धेत थायलंड, जर्मनी व युरोप येथून 150 च्या वर खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. सिंगल स्पर्धेत 32 तर डबल स्पर्धेमध्ये 16 खेळाडूंचा सहभाग आहे. भारतीय व परदेशातील नामांकित खेळाडू येथे आपल्या खेळाचे प्रदर्शन करणार आहेत. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंचही या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. क्ले-कोर्टची सुविधाही याठिकाणी करण्यात आली आहे, अशी माहिती आयोजकांनी यावेळी दिली.