प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांची माहिती
नागपूर – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची बाजू समाजासमोर आणि माध्यमांसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रवक्त्यांची निवड करण्याचा निर्णय प्रदेश युवक काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष कुणाल राऊत यांनी घेतला आहे. खासदार राहुलजी गांधी यांच्या मार्गदर्शनात व भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा आलरावुजी व युवा काँग्रेसे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवासजी बी.व्ही. यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

या प्रवक्त्यांच्या निवडीसाठी युवक काँग्रेसने ‘यंग इंडिया के बोल’ उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले असल्याची घोषणा कुणाल राऊत यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषदेत केली.
युवक काँग्रेसतर्फे ‘यंग इंडिया के बोल’ हे अभियान राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येत असून, या माध्यमातून तालुकास्तरावर स्पर्धा घेऊन त्यातील सर्वोत्तम पाच स्पर्धकांना काँग्रेसच्या जिल्हा प्रवक्तेपदी नियुक्ती मिळणार आहे,अशी माहिती राऊत यांनी दिली.

याच पद्धतीने राज्य व राष्ट्रीय प्रवक्त्यांची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी नि:पक्षपातीपणे निवड करू शकणाऱ्या पंचांची नेमणूक करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रभारी जयेश गुरनानीजी, प्रभारी विजय सिंह राजू, राष्ट्रीय सचिव बंटी शेळके, प्रदेश महासचिव श्रीनिवास नल्लमवार, प्रदेश प्रवक्ता संदेश झाडे, विनय जाधव, जिल्हाध्यक्ष मितलेश कन्हेरे, शहर अध्यक्ष तौसीफ खान, प्रामुख्याने उपस्थित होते.