– क्यूआर कोड प्रणालीचे महापौरांच्या हस्ते उदघाटन
नागपूर : नागपूर शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलनाची व्यवस्था अधिक व्यापक आणि पारदर्शक करण्यासाठी क्यूआर कोड पद्धतीवर आधारित ‘स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टिम’ची सुरुवात शुक्रवारी (ता. ४) गांधीबाग झोन अंतर्गत इतवारी टांगा स्टॅन्ड माधवराव मुकाजी चौक येथून महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भूवनेश्वरी एस., गांधीबाग झोन सभापती श्रीमती श्रद्धा पाठक, ज्येष्ठ नगरसेवक ऍड. संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, सरला नायक, वंदना येंगवटवार, घन कचरा व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, ई-गर्व्हन्स विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. शील घुले आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, कचरा संकलन करणारे स्वच्छतादूत घरोघरी वेळेवर येत नाही, त्यांच्या वेळा निश्चित नाही. अशा कचरा संकलनाबाबत नगरसेवक आणि नागरिकांच्या येत असलेल्या तक्रारी लक्षात घेऊन त्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने केरळच्या धर्तीवर क्यूआर कोड आधारित संकल्पना पुढे आणली. स्मार्ट प्रकल्प स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुरु करण्यात आले. या प्रणालीच्या माध्यमातून कचरा संकलन केलेल्या घराचा क्रमांक, घरमालकाची नाव अशी माहिती अधिकाऱ्यांना प्राप्त होणार आहे. नक्कीच या ‘स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम’मुळे शहरातील कचरा संकलन अधिक व्यापक आणि पारदर्शक होईल. तसेच नागरिकांना होत असलेल्या समस्यांचे निराकरण सुद्धा होईल, असा विश्वास यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.
कचरा संकलन करणारी गाडी घरापर्यंत येत नाही, नियमित कचरा उचलल्या जात नाही, अशा विविध प्रकारच्या तक्रारींवर आता पुढे लगाम बसणार आहे. ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून आता कुठल्या घरातून कचरा उचलण्यात आला अथवा नाही, याची इत्यंभूत माहिती मिळणार आहे. यामुळे कचरा संकलनाची व्यवस्था अधिक व्यापक आणि पारदर्शक होणार आहे.
नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलोपमेंट कार्पोरेशन लिमिटेड व नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नागपूर शहरात स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम गांधीबाग झोन येथून सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत नागरिकांच्या घरांवर क्यूआर कोडचे स्टिकर लावण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेकडे सतत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी या अभिनव सिस्टीम अंतर्गत महापौरांच्या उपस्थितीत दहा घरांवर क्यूआर कोड स्टिकर लावण्यात आले आहे. कचरा संकलन करणारा कर्मचारी आधी कोडवर आपल्या मोबाईलद्वारे स्कॅन करेल आणि वजन करून कचरा घेईल. या व्यवस्थेमुळे नागरिकांच्या घरातून ठराविक वेळेत कचरा उचलला जाईल, अशी माहिती ई गव्हर्नन्स विभागाचे महाव्यस्थापक डॉ. शील घुले यांनी यावेळी दिली.
सदर प्रकल्प महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून होत आहे. महापौरांनी गौस सोलंकी, ओंकार लाखाते, मोना दवे, केदार लिचमिया, पाचूगोपाल प्रमाणिक, मितेश पारेख, गणेश गुमगावकर, भारती कोठारी आणि जयप्रकाश पारेख यांच्या घरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. तसेच दारांवर क्यूआर कोड स्टिकर लावून नवीन सिस्टीमबद्दल माहिती दिली. आय टी आय कंपनीतर्फे क्यूआर कोड स्टिकर लावण्यात आले. यावेळी कंपनीचे आयुष माहेश्वरी, मुख्य प्रकल्प अधिकारी आणि रॉड्रिक्स मॉरीस, अससोसिएट सेल्स उपस्थित होते.