संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
२९ जून शाळेचा पहिला दिवस साजरा
विद्यार्थ्यांचे ‘स्कुल चले हम’
कामठी, ता.२९ :- गेल्या दोन वर्षात कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी नूतन सरस्वती विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
शिक्षणोत्सव २०२२ आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा ग्रामीण उद्धार सोसायटीचे अध्यक्ष देवराव रडके, संस्थेचे सचिव डॉ. विजय रडके, सहसचिव तुषार रडके प्रमुख पाहुणे म्हणून तर शाळेचे मुख्याध्यापिका श्वेता रडके, उपमुख्याध्यापक वामन मन्ने, पर्यवेक्षक राजकुमार रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते विद्येची देवता माॅ सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प वर्षाव करुन, पुष्पगुच्छ व चाॅकलेट वाटप करुन टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाहुण्यांच्या हस्ते मोफत पाठय़पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सहज मनाच्या संस्कारांना उत्तम आहे. शाळा…. म्हणूनच अ, आ, इ शिकण्यास…. नियमित जा बाळा या विषयावर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करुन सर्व विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख संगीता शर्मा यांनी तर आभार खेमराज व्यापारी यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेतील शिक्षक विजय वांढरे, सुबोध रंगारी यांच्यासह अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी पालक वर्ग व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.